सावर्डे बुद्रुक / वार्ताहर
आमच्या घरातील लहान बालकाचा निष्पाप बळीं जाऊन आम्हाला अजून न्याय मिळाला नाही ,आम्हा सुशिक्षित कुटुंबियांवर सहन न होणारा अन्याय झाला असून दुःखाचे डोंगर एकामागून एक वाढतच आहेत. अशातच क्रूर आरोपीला शिक्षा होणे गरजेचे असताना पोलिसाकडूनच आम्हा कुटुंबियांना चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. आम्हाला न्याय देण्याऐवजी आरोपी वैद्य कुटुंबियांना गावात आणण्याची पोलिसांची दुदैवी धडपड असल्याचे निदर्शनास येत असून आम्हाला न्याय न मिळाल्यास मुरगुड पोलीस ठाण्यासमोर आम्ही आत्मदहन करणार आहोत असा इशारा पाटील कुटुंबियांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे.
कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रविंद्र पाटील या बालकाच्या सावर्डे बुद्रुक येथे झालेल्या खूनामुळे समाजमन सुन्न झाले होते. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. गेली पाच महिने झाले तरी आरोपी ताब्यात असताना सुद्धा खुनाचे कारण स्पष्ट होत नाही, यामुळे समाजात तीव्र असंतोषाची भावना आहे.
पाटील कुटुंबियांच्यावर एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळत आहेत. लहान बालकाचा निष्पाप बळी व त्यानंतर आता घरातील आधारवड असलेल्या आजीचे निधन झाले आहे. त्यातच पोलिसांचा सुरू असलेला ससेमिरा यामुळे पाटील कुटुंबिय हतबल झाले आहेत. सोनाळीतील ग्रामस्थ या क्रूर घटनेने चिंतेत आहेत. घडलेल्या घटनेपासून गावात तणावाचे वातावरण आहे. समाजात अजूनही तीव्र असंतोष आहे. घडलेल्या क्रूर घटनेने ग्रामस्थांमध्ये तीव्र चीड आहे. आरोपीच्या कुटुंबियांना पोलीसांचे संरक्षण, त्यांच्या कुटुंबियांना गावात आणण्यासाठी पोलिसाकडून सुरू असलेली धडपड याचे गौडबंगाल काय? याबाबत समाजात तर्क वितर्क सुरू आहेत. त्यातच ग्रामपंचायतला वारंवार नोटिसा येत आहेत त्यामुळे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य हैराण झाले आहेत. यामुळे गावात वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आरोपीचे कुटुंबीय सहभागी आहेत का याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
या कुटुंबात सोनाळीचे पोलीस पाटील पदाचा कार्यभार अनेक वर्षे होते. सुशिक्षित व संस्कृत शिक्षक असलेले पाटील कुटुंबीय साधेपणा स्वभावाचे आहेत. अशातच त्यांच्या घरातील बालकाचा निष्पाप बळी गेल्याने संपूर्ण कुटुंबीय मानसिक तणावाखाली आहे. अजूनही वैद्य कुटुंबीयाकडून आम्हास जीवितास धोका असल्याने माणुसकीच्या नात्याने न्याय मिळेल या अपेक्षेने केविलवाणी पद्धतीने टाहो फोडत आहे. या पाटील कुटुंबीया न्याय कधी मिळणार? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. या पत्रकार परिषदेला वरदचे वडील रविंद्र पाटील,आई पूनम पाटील ,शंकर पाटील ,डि आर पाटील, नामदेव हिरुगडे, रेखा पाटील, पी के पाटील ,एकनाथ पाटील, आनंदी पाटील आदी कुटुंबीय उपस्थित होते.









