आयुष्याच्या प्रवासात वयाचा प्रत्येक टप्पा हा नवनवीन अनुभव घेऊन येत असतो. प्रत्येक वयोगटातील अनुभव हे वेगवेगळे आणि खास असतात. बालपणापासून ते वार्धक्मयापर्यंत आपल्या शरीरासोबत मनामध्येदेखील अनेक बदल होत असतात. वयानुसार माणसाच्या इच्छा, ध्येय, जीवनशैली सगळेच बदलत असते. पण आयुष्याची एक सुंदर गोष्ट म्हणजे प्रत्येक अनुभव माणसाला नवनवीन गोष्टी शिकवत असतो आणि त्याला आयुष्य जगण्याचे प्रोत्साहन देत असतो.
लहानपणापासूनच आपल्याला आयुष्याचा एक समाजमान्य नक्षा आखून दिलेला असतो. त्याचे रूप साधारणतः असे काही असते. बालपणापासून तारुण्यापर्यंत शिक्षण, त्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय, मग लग्न, संसार आणि मुले मोठी झाली की एकांतवास. हीच रीत जगन्मान्य आहे. ह्या चक्रामधे जरा जरी बदल झाला तरी माणूस गोंधळून जातो. या चक्रातील सर्वात भीतीदायक भाग म्हणजेच वृद्धापकाळ. जितके प्रत्येकाला तारुण्य हवेहवेसे वाटते तितकाच हा वृद्धापकाळ नको नकोसा वाटतो. समाजमान्य रीतीनुसार तोपर्यंत माणसांनी जगातील सर्व कर्तव्ये पार पाडलेली असतात. नोकरी व्यवसाय नसल्याने माणसाच्या हातात बराच रिकामा वेळ असतो. पण जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही असे म्हणतात. तारुण्यात माणसाकडे प्रचंड ऊर्जा असते, पण आर्थिक स्थिरता नसते आणि वृद्धापकाळात माणसाकडे तेच आर्थिक स्थैर्य असते, पण शारीरिक क्षमता कमी झालेली असते. वाढत्या वयाबरोबर आलेल्या शारीरिक मर्यादांमुळे बरेचदा माणसाचा जीवन जगण्याचा उत्साहदेखील कमी होतो. पण इतिहास प्रमाण आहे की माणूस आपले आयुष्य आपल्या इच्छाशक्तीवर घडवतो आणि माणसाच्या मनापुढे शारीरिक मर्यादा एक क्षुल्लक अडचण आहे.

माणूस शरीराने वृद्ध होतो, मनाने नाही. आपले शरीर हे आपल्याला परमेश्वराने जगाचा पुरेपूर आनंद घ्यायला दिलेले एक साधन आहे. ते जरी थकले, तरीही मन कणखर असले तर माणूस आयुष्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. समाजाने माणसाच्या प्रत्येक भूमिकेला एक ठरावीक पैलू देऊन ठेवला आहे. एक उदाहरण म्हणजे, जर एखादी व्यक्ती आपल्या वृद्धापकाळातदेखील नवनवीन पद्धती स्वीकारून प्रपंच्याच्या बाहेर जाऊन आयुष्याचा अनुभव घेत असेल तर ते लगेच नजरेत भरते. वृद्धापकाळात माणसाने नवनवीन गोष्टींचा अनुभव घेऊ नये, एखाद्या वृद्ध विधवा किंवा विधुर व्यक्तीने पुन्हा लग्न करू नये, बैठे छंदच जोपासावेत, देव धर्म करावा असे समाजाला वाटते. आधीच आयुष्य मूठभर, त्यातदेखील एका विशिष्ट वयानंतर माणसाने जगणे का सोडावे? कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्याची आपल्याला अजून माहितीदेखील नाही, किती तरी अनुभव आहेत जे आपण अजून घेतलेदेखील नाहीत आणि त्या आधीच आयुष्याला नाकारून अंतिम पर्वाची वाट का बघावी?
वृद्धापकाळ हा खूप नाजूक असतो. संसारातील सर्व जबाबदाऱया पार पडलेल्या असतात आणि माणसाची सोबत कमी असते. अशा वेळेला एकटेपणा आणि भूतकाळापासून विरक्ती येणे साहजिकच आहे. काही बॉलीवूड चित्रपट आहेत जे समाजमान्य वार्धक्मयाचे प्रतिबिंब खोडून एक नवीन दृष्टिकोन आपल्याला माणसाच्या अपरंपार इच्छाशक्तीची जाणीव करून देतात. त्यातील एक उदाहरण म्हणजे आयुष्मान खुरानाचा सिनेमा ‘बधाई हो.’
भारतीय संस्कृतीप्रमाणे आपले आई वडील आपल्यासाठी देवतासमान असतात. आपल्याला लहानपणापासून हेच दाखवले जाते की आई-वडिलांच्या आयुष्याचे ध्येय हे त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे व मुलांना वाढवणे आहे. या सर्व गोष्टींमुळे आपण नकळत आपल्या आई-वडिलांना आपल्या अपेक्षांच्या पेटीमध्ये बंद करून टाकतो. आई वडील म्हणून त्यांचा आदर्श समोर ठेवताना आपण हे विसरतो की ते देखील माणूसच आहेत. त्यांनादेखील त्याच भावना जाणवतात ज्या त्या घरातील तरुणांना जाणवत असतील आणि जरी ते आई-वडील असले तरी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्यादेखील आयुष्याकडून काही अपेक्षा असतात. प्रेम, जिव्हाळा ह्या सर्व गोष्टी उघडपणे व्यक्त करण्याची पद्धत आपल्या देशात नाही. त्यामुळे आपले आई-वडील त्यांच्या मध्यकाळातदेखील त्यांचे तारुण्य जपून आहेत हे बऱयाच लोकांना पटत नाही.
या सिनेमामध्ये आयुष्मान खुरानाच्या आईवडिलांची भूमिका निभावणारे नीना गुप्ता आणि गजराज राव हा समाजमान्य पूर्वग्रहपण आपण एक खोडून काढतात. प्रेमसंबंधात फक्त शारीरिक वासना नसते. खरं प्रेम हे एखाद्या अल्लड लहान मुलाच्या मनासारखे असते. पूर्वग्रहरहित आणि निर्मळ. हा सिनेमा रोमान्स आणि प्रेमाला एक नवीन पैलू देऊन प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. नीना गुप्ता आणि गजराज राव ही एक मध्यमवर्गीय, मध्यमवयीन जोडी आहे. घर, एक गाडी, स्थिर नोकरी आणि मोठी झालेली मुले असे त्यांचे आयुष्य आहे. त्यांच्या वयासाठी असलेल्या सगळय़ा अपेक्षा त्यांनी पार पडलेल्या आहेत आणि मुलाचे लग्न झाले की ते आपले आयुष्य शांतपणे जगायला मोकळे, अशी काहीशी परिस्थिती आहे. अशावेळेला शक्मयतो माणूस निवृत्तीची तयारी करतो आणि एखादा छंद जोपासायला लागतो. पण नीना गुप्ता आणि गजराज रावचे निरागस प्रेम बघून कौतुकच वाटते.
माणूस आपले आयुष्य स्वतःच्या मनाच्या जोरावर घडवतो यात वादच नाही. याचेच उदाहरण देणारा आणखी एक हिंदी चित्रपट म्हणजे 2018 साली प्रदर्शित झालेला ‘102 नॉट आऊट’. यात वृद्ध वडील आणि मुलाच्या आयुष्याकडे पाहण्याचा फरक हा खूप विनोदी पण मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे. 70 वषीय मुलगा ऋषी कपूर आणि 101 वषीय वडील अमिताभ बच्चन यांच्या केवळ दृष्टिकोनामुळे राहणीमान किती भिन्न आहे हे लक्षात येते. ऋषीकपूर आयुष्याला कंटाळलेला असतो आणि त्यामुळे रोज नवीन दुखणी काढत असतो. त्याचा दृष्टीकोन नकारात्मक असल्याने त्याला सगळेच जग वाईट दिसत असते. तिथेच, 101 वषीय अमिताभ बच्चन आपले थकलेले शरीर आणि तंदुरुस्त मन घेऊन आयुष्याचा आस्वाद घेत फिरत असतो.
वृद्धापकाळ म्हणजे दुसरे बालपण असे म्हणले जाते कारण माणूस पुन्हा एकदा इतरांवर अवलंबून रहायला लागलेला असतो. अशा वेळेला त्याला त्याच्या भविष्याची जाणीव करून देण्यापेक्षा त्याला वर्तमानातील सुंदरतेची जाणीव करून दिली पाहिजे. आयुष्य जर लहान आहे तर त्यात येणाऱया अटळ गोष्टी जसे की वाढत्या वयाला घाबरून जाण्यात काय उपयोग आहे? ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांच्या मागे धावत बसून हातात असलेल्या गोष्टींची मजा गमावण्यात काय अर्थ आहे?
आयुष्य खूप लहरी आहे आणि ते कोणासाठी थांबत नाही. अशा वेळेला त्याला घाबरून जाऊन आयुष्यातील सुख फक्त वयामुळे का नाकारावे? माणसाच्या शरीराचा कधी ना कधी नाश होणार आहे, पण त्याच्या भावना अमर आहेत. त्यांना कोणीही लगाम घालू शकत नाही. वार्धक्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर माणूस समाजात बदल घडवून आणेलच, पण त्याचबरोबर आयुष्याच्या अनावश्यक भीतीपासूनदेखील मुक्त होईल आणि शेवटी, वृद्ध काय आणि तरुण काय, वय हा फक्त एक अंक आहे. माणसाचे अस्तित्व सिद्ध होते त्याच्या जगण्याच्या इच्छाशक्तीवर. ती जोपासली पाहिजे, बाकी सर्व अडचणी त्याच्यासमोर क्षुल्लक वाटू लागतील.
-श्राव्या माधव कुलकर्णी








