कोरोना काळात वेळेचा केला सदुपयोग
ओंकार अवसरे / जैतापूर
अफाट इच्छाशक्ती व समाजाला माहिती देऊन विकास करण्याची भावना असेल तर वयाच बंधनही नगण्य असत, याच उत्तम उदाहरण राजापूर तालुक्यातील आडिवरे कोंडसर बुद्रुक गावातील एका 81 वर्षाच्या आजोबांनी आपल्या दोन पुस्तकातून दाखवून दिले आहे. उतारवयात त्यांनी लिहिलेली दोन पुस्तके नवोदित साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.
या 81 वर्षाच्या तरुणाचे नाव बाळकृष्ण पांडुरंग परांजपे असे असून त्यांना आदराने तात्या फौजदार असे म्हटले जाते. कोरोनामुळे व प्रकृतीमुळे परांजपे हे घरीच होते. या दरम्यान त्यांनी वेळेचा सदुपयोग करत पुस्तक लिहिण्याचे ठरवले. त्यांनी ‘अनुभव’ आणि ‘असा आमचा कोंडसर बुद्रुक गाव’ ही दोन पुस्तके लिहिली आहेत. या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच श्री महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयच्या सभागृहात पार पडला. अनुभव या पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्ष सुधीर जोशी व असा आमचा कोंडसर बुद्रुक गाव या पुस्तकाचे प्रकाशन मुख्याध्यापक गावित सर यांच्याहस्ते झाले.
परांजपे हे 1957 ते 2000 पर्यत कोंडसर बुद्रुक गावाचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. सुरुवातीला महिन्याला अवघे 3 रुपये मानधन होते. ते 43 वर्षे पोलीस पाटीलपदी होते. यासह ते अनेक संस्थेत, मंडळात पदाधिकारी होते. या अनेक वर्षांमध्ये त्यांना खूप प्रकारची माणसे ओळखता आली. पोलीस पाटीलकी व बरेच काही शासकीय व ग्रामीण घटनांचे अनुभव त्यांनी ‘अनुभव’ या पुस्तकात अत्यंत प्रभावीपणे वर्णन केले आहे.
आपल्या गावाची माहिती लेखी स्वरूपात असावी, जुनी माहिती नवीन लोकांनाही समजावी, या उद्देशाने गावाची भौगोलिक व सामाजिक रचना, देवस्थाने उपक्रम, प्रसिद्ध ठिकाणे, गावातील विविध जाती धर्माच्या प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची उल्लेखनीय कामे यासह अनेक घटनाचे यथार्थ वर्णन ‘असा आमचा कोंडसर बुद्रुक गाव’ या पुस्तकात केले आहे. तात्या परांजपे हे केवळ कोंडसर गावातच नव्हे तर आडिवरेसह पूर्ण तालुक्यात सुपरिचित आहेत. त्यांनी शासकीय सेवेत प्रामाणिकपणे योगदान दिले असून ते विकासकामांतही अग्रस्थानी आहेत. लक्ष्मी नारायण मंदिर भराडे येथे सचिवपदी कार्यरत होते. कोंडसर बुद्रुक शाळा सहाय्यक समिती येथे अध्यक्ष, राजापूर व नाटे पोलीस पाटील संघटना सल्लागार यासह अनेक संस्था व मंडळात महत्वाच्या पदी प्रामाणिक व लोकप्रिय भूमिका बजावली. तसेच त्यांनी कोंडसर तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यावेळी त्यांच्या सक्षम नेतृत्व व कार्यामुळे शासनातर्फे गावाला तंटामुक्त म्हणून 4 लाखाचे बक्षीस मिळाले होते. ही दोन्ही पुस्तक माहिती व अनुभवाने परिपूर्ण असून वाचनीय आहेत. प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी गजानन भिडे, वामन शेवडे, सुधीर जोशी, माधव फणसे, यासह आप्तेष्ट व पुस्तकप्रेमी उपस्थित होते.









