क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
वयस्कर क्रीडापटूंमध्ये राज्यात बेंगळूरनंतर बेळगावचे वयस्कर क्रीडापटू विविध स्पर्धांत चमकदार प्रदर्शन करीत आले आहेत. त्यापैकी एक क्रीडापटू सुरेश देवरमनी यांनी धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर चमक दाखविल्याने त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही निवड झाली होती.
उचगावसारख्या खेडय़ात गरीब शेतकरी घराण्यातील दलित कुटुंबात जन्मलेल्या सुरेश देवरमनी यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्यांचे आजोबा व वडील नावाजलेले पैलवान होते. त्यांचाच वारसा जपत सुरेश देवरमनी यांनी लहान वयातच धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत चमक दाखविली. शालेय, पदवीपूर्व महाविद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण घेताना खेळाकडेही दुर्लक्ष न करता नियमित सराव चालू ठेवला होता. भारत सरकारच्या डिफेन्स अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये नोकरी करीत ग्रामीण खेळाबरोबर शहरी खेळही त्यांनी आत्मसात केले. त्यांनी डिपार्टमेंटमेंटल टेबल टेनिस राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत भाग घेतला. सेवानिवृत्तीनंतरही खेळाची आवड कायम ठेवत त्यांनी धावण्याचा नियमित सराव चालू ठेवला. नंतर त्यांनी वयस्करांच्या स्पर्धेत सातत्याने भाग घेत अनेक बक्षिसेही मिळविली. राष्ट्रीय स्तरावर अमृतसर, दिल्ली, उत्तरप्रदेश, पुणे, नाशिक, राजस्थान, छत्तीसगड, केरळ व कर्नाटक येथील धावण्याच्या स्पर्धांत त्यांनी भाग घेतला. तसेच राज्य पातळीवर मंगळूर, म्हैसूर, बेंगळूर, होसपेट, शिमोगा, चित्रदुर्ग, हुबळी, कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी येथील स्पर्धांतही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांची कामगिरी पाहून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही त्यांची निवड झाली होती. पण हलाखीची परिस्थिती व अन्य कारणांमुळे त्यांना स्पर्धांत भाग घेता आला नाही. मात्र भविष्यात अशी संधी मिळाल्यास त्यात निश्चितच भाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आतावर 110 पदके पटकाविली असून त्यात सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांचा समावेश आहे. वयाच्या 70 व्या वर्षीही ते नियमितपणे करीत आहेत.. आजच्या तरुणांनी व्यसनाधीन न होता शरीर सदृढ बनविण्यासाठी नियमित व्यायाम व सराव करण्याकडे जास्त लक्ष पुरवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र आजची पिढी कंप्युटर, मोबाईलच्या गेममध्ये अडकून पडल्याचे दिसून येते. त्यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी लक्ष पुरवून आपल्या मुलांना खेळाकडे वळविले पाहिजे, असा सल्ला सुरेश देवरमनी यांनी दिला आहे.









