प्रतिनिधी / बेळगाव
सध्या सर्वत्रच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. परिणामी वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांची पाणी व चाऱयासाठी भटकंती सुरू झाली. वन्यप्राणी चारा व भक्ष्यांच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहेत. याची दखल घेत वनविभागाने जंगलात वन्यप्राण्यांसाठी छोटे-मोठे पाणवठे तयार करून त्यात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वन्यप्राण्यांची भटकंती थांबण्याची शक्यता आहे.
खानापूर तालुक्मयातील गोल्याळी, कणकुंबी परिसरात वनक्षेत्र अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. सध्या उन्हाळय़ाचे दिवस असल्याने कडक उन्हाळा, वणव्यामुळे ओसाड पडलेले वनक्षेत्र यामुळे वन्यप्राण्यांना खाण्यासाठी अन्न व पाणी पिण्यास अडचणी निर्माण होत आहेत. वन्यप्राणी चारा व पाण्याच्या शोधार्थ सैरावैरा धावत असून मानवी वस्तीत देखील घुसत आहेत. अनेकदा वन्यप्राण्यांना चारा व पाण्यासाठी जीव गमवावा लागत आहेत. तर काही वेळेला वन्यप्राणी व मानव संघर्ष सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाने प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी ठिकठिकाणी पाणवठे केले आहेत.
वनक्षेत्रातील तलावांचा वापर
बेळगाव विभागाला मोठय़ा प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून या वनक्षेत्रात वनतलाव उभारण्यात आले आहेत. या वनतलावांचा वापर आता वाढत्या उन्हाळय़ात होत आहे. वन्यप्राण्यांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी गोल्याळी, कणकुंबी आदी वनक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात ठिकठिकाणी लहान वनतलाव निर्माण करण्यात आले आहेत. या वनतलावाचा वापर देखील आता वन्यप्राण्यांसाठी होत असल्याने थोडय़ा प्रमाणात वन्यप्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.









