बावडेकर यांची चार गोडाऊन सील, उर्वरित दोन गोडाऊनची आज तपासणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरातील महापालिका परिसरातील बावडेकर यांची दोन आयुर्वेदिक दुकाने वन विभागाने सोमवारी सील केली. मंगळवारी या व्यापाऱयांच्या चार गोडाऊनची तपासणी केली. जिल्ह्यात 6 पथकांद्वारे सुमारे 70 जणांकडून चौकशी, तपासणीची कारवाई सुरू आहे. कोल्हापूरसह सातारा, सागंली जिल्ह्यात एकाचवेळी ही धडक कारवाई केली. दरम्यान, बावडेकर यांच्या उर्वरित दोन गोडाऊनची बुधवारी तपासणी होणार आहे. काही गोडाऊनमध्ये सांबराची शिंगे, घोरपडीचे अवयव, दुर्मिळ वनस्पतीची भुकटी सापडल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
विक्रीस बंदी असलेल्या काही वनौषधी, प्राण्याचा समावेश असलेल्या घटकांची विक्री केली जात असल्यावरून ही कारवाई केली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील वन विभागाला तपासात विक्रीस बंदी असलेल्या काही वनैषधी, निर्बंधीत प्राण्याचे घटक आढळले. चौकशीत संशयिताने कोल्हापूर महापालिका परिसरातील आयुर्वेदिक दुकानांतून ही औषध खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानंतर इस्लामपूर वन विभागाने कोल्हापूर वन विभागाला ही माहिती दिली. सहायक वनसंरक्षक सुनील लिमयेंसह करवीरचे वनाधिकारी रमेश कांबळे, कर्मचाऱ्यांनी मनपा चौकातील बावडेकर यांची दोन आयुर्वेदीक औषध दुकाने सील केली. त्यानंतर तेथील पोलीस बंदोबस्त मंगळवारी वाढवण्यात आला.
दरम्यान, मंगळवारी वन विभागाच्या विविध पथकांनी कोल्हापूरसह सांगली अन् सातारा जिल्ह्यात एकाचवेळी धडक कारवाई केली. कोल्हापुरात वन विभागाने संबंधितांच्या सहापैकी चार गोडाऊनची तपासणी केली. यामध्ये काही पुरावे या पथकांच्या हाती लागले आहेत. अद्यापी दोन गोडाऊनची तपासणी बाकी आहे. ही गोडाऊन बुधवारी तपासली जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.
कोल्हापुरातील कारवाईमध्ये सहायक वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन विभागीय वनाधिकारी, 6 परिक्षेत्र वनाधिकारी, 8 परिमंडल वनाधिकारी, 16 वनसंरक्षकांचा समावेश आहे. तसेच परिमंडल वनाधिकाऱयांच्या 6 टीम याची चौकशी करत आहेत. यामध्ये करवीर, हातकणंगले, गगनबावडा, पन्हाळा, पेंडाखळे, परिमंडल वनाधिकांऱयांसह, चिखली रोपवाटिकेतील स्टाफचा समावेश आहे. तपासणी आणि चौकशीमध्ये वन विभागातील 70 हून अधिक अधिकारी, कर्मचाऱयांचा सहभाग आहे. वस्तुस्थिती पाहता भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि वन कायदा 1927 अंतर्गत संबंधितांवर कारवाई होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सांबराची शिंगे, घोरपडीचे अवयव, दुर्मीळ वनस्पतीची भुकटी
शहरातील सील केलेल्या दोन वनौषधी दुकानदारांच्या चार गोडाऊनमधून मंगळवारी समुद्र शेवाळ, इंद्रजल, चंदनाची पावडर, रक्तचंदन, सप्तरंगी या दुर्मीळ वनौषधी तसेच सांबरांची शिंगे आणि घोरपडीचे काही अवयव, अवशेष मिळून आले आहेत. बुधवारी आणखी दोन गोडाऊन तपासली जाणार आहेत. त्यात दिसून येणाऱया घटकांनंतर किती माल जप्त केला, याची माहिती समोर येणार आहे.