वार्ताहर / किणये
कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ लागले आहेत. लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. हॉटेल, घरकाम आणि धुणीभांडी करणाऱया महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा उदरनिर्वाह होणे अवघड बनले आहे. या परिस्थितीत अशा महिलांना सर्वस्तरातून मदत मिळणे गरजेचे आहे. हनुमाननगर परिसरातील घरकाम करणाऱया काही महिलांना वन टच फौंडेशनच्यावतीने जीवनावश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
वन टच फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील व माधुरी माळी यांच्या विशेष पुढाकारातून ही मदत करण्यात आली. संदीप मोरे, वृषाली मोरे यांच्याकडून दहा कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्य, निर्मला पवार, रामचंद्र शहापुरे, प्रिया, ऍड. सुधीर चव्हाण यांच्याकडून आठ कुटुंबीयांना अशा एकूण 18 कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्य व धान्य देण्यात आले. हे साहित्य वन टच फौंडेशनच्या माध्यमातून दिले.वन टच फौंडेशनमार्फत नेहमीच गरजूंना वेगवेगळय़ा स्वरुपात मदत करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरात रस्तेकाम करणाऱया काही कामगारवर्गांना फौंडेशनच्यावतीने शीतपेये व खाद्यपदार्थ पुरविण्यात आले. हनुमाननगर येथील महिलांना साहित्याचे वाटप करताना फौंडेशनचे उपाध्यक्ष संतोष गंधवाले, संचालिका वृषाली मोरे, शिल्पा केकरे, जयप्रकाश बेळगावकर आदी उपस्थित होते.









