वनखात्याचे वन्यप्राण्यांना दत्तक घेण्यासाठी आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वनखात्यामार्फत दि. 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. वन्यजीव सप्ताहनिमित्त खात्यामार्फत वन्यप्राणी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात वन्यप्राणी दाखल झाले आहेत. त्यांना दत्तक घेण्यासाठी वन्यप्रेमींबरोबर नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन वनसंरक्षणाधिकारी हर्षाबानू यांनी केले आहे.
शहरापासून अगदी जवळ असलेल्या भुतरामहट्टी येथील मिनी प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, बिबटे आणि कोल्हे दाखल झाले आहेत. याबरोबरच मगर, हरीण, सांबर, चितळ यांसह विविध पक्षी ठेवण्यात आले आहेत. या वन्यजीवांचा दैनंदिन खर्च अधिक आहे. त्यातच कोरोनामुळे पर्यटकांच्या माध्यमातून मिळणारा महसूलदेखील कमी झाला आहे. संग्रहालयातील मोठय़ा प्राण्यांना दैनंदिन 10 ते 15 किलो मांस लागते. त्यामुळे खर्चही अधिक आहे. तसेच दैनंदिन देखभालीवर अधिक प्रमाणात खर्च केला जातो. मात्र त्याप्रमाणात उत्पन्न मिळत नसल्याने प्राणी संग्रहालय अडचणीत आले आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, वन्यप्रेमींनी प्राण्यांना दत्तक घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचे आरएफओ राकेश अर्जुनवाड यांनी केले आहे.
दानशूरांचा कालावधी संपला
गतवषी दाखल झालेल्या सिंह, वाघ, बिबटे आणि कोल्हय़ांना काही काळासाठी दानशूर व्यक्तींनी दत्तक घेतले होते. एक वर्षासाठी दत्तक घेतलेल्या दानशूरांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे पुढील काळासाठी प्राण्यांना दत्तक घेणे आवश्यक आहे. यासाठी खात्याकडून आवाहन करण्यात येत आहे.









