प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली 15 दिवसांतच परवानगी
घातक रसायन नाल्यात ओतल्याप्रकरणी केली होती कारवाई
प्रतिनिधी / चिपळूण
खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील आवाशीनजीकच्या नाल्यात टँकरमधून घातक रसायन ओतल्याप्रकरणी योजना इंडस्ट्रीज आणि वनविड या दोन कंपन्यांवरील उत्पादनबंदी उठविण्यात आली आहे. 15 दिवसांच्या आतच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या दोन्ही कारखान्यांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र हरिश्री आणि श्रेयस या कारखान्यांवरील उत्पादनबंदी कायम ठेवली असून, पुढील आठवडÎात त्यांची सुनावणी होणार आहे.
गेल्या महिन्यात महामार्गावरील असगणी-लवेलनजीक घातक रसायन ओतण्याचे प्रकार वाढीस लागल्यानंतर याविरोधात ग्रामस्थांनी तक्रारी करूनही प्रकार थांबत नव्हते. अखेर ग्रामस्थांनीच जागता पहारा ठेवत आवाशीनजीकच्या नाल्यात घातक रसायन ओतणारे दोन टँकर पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हे दोन्ही टँकर योजना इंडस्ट्रीज, वनविड कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार या कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याचा प्रस्ताव चिपळूण येथील उपप्रादेशिक अधिकाऱयांनी कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवला होता. तरीही कंपन्यांचे उत्पादन सुरू असल्याने राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत उत्पादन बंद करण्याची `डेडलाईन’ दिल्यानंतर दोन्ही कारखान्यांवर कारवाई केली.
तळोजा येथे विल्हेवाट; दुप्पट बँक गॅरंटी जमा करण्याचे आदेश
दोन दिवसांपूर्वी योजना व वनविड या दोन्ही कारखान्यांना उत्पादन सुरू करण्यास कोल्हापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली. मात्र ती देताना काही अटीही घातल्या आहेत. यापूर्वी या कंपन्यांचे रसायन आंध्रप्रदेशमध्ये बायप्रॉडक्टसाठी नेण्याचा परवाना दिला आहे. मात्र तेथे रसायन नेताना ते वाटेतच सोडले जात असे. त्यामुळे आता तळोजा येथे रसायनाची विल्हेवाट लावण्यास सांगण्यात आले. तसेच बँक गॅरंटीची रक्कम जप्त करून नव्याने दुप्पट बँक गॅरंटी जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत. पर्यावरणहानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई जमा करण्याचेही आदेश दिले आहेत.
दोन्ही कंपन्यांना उत्पादनास परवानगी
रसायन ओतल्याप्रकरणी बंदची कारवाई करण्यात आलेल्या वनविड आणि योजना इंडस्ट्रीज या दोन्ही कारखान्यांना उत्पादन सुरू करण्यास कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाने सुनावणीनंतर परवानगी दिली आहे. या दोन्ही कारखान्यांच्या बंक गँरंटी जप्तीसह काही निर्बंध नव्याने घालण्यात आले आहेत.
-अजय चव्हाण, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिपळूण









