वृत्तसंस्था/ डय़ुनेडिन
शनिवारी येथे झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने बांगलादेशचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. ही मालिका तीन सामन्यांची खेळविली जात आहे.
या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. ढगाळ वातावरणाचा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बोल्टने पुरेपूर फायदा उठविताना आपल्या स्विंग गोलंदाजीवर 27 धावांत 4 गडी बाद केले. बांगलादेशचा डाव केवळ 41.5 षटकांत 131 धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 21.2 षटकांत 2 बाद 132 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला.
या सामन्यात बांगलादेशचे फलंदाज ढगाळ वातारणात चिवट फलंदाजी करू शकले नाहीत. बांगलादेश संघातील मेहमुदुल्लाने 54 चेंडूत 27 धावा जमविल्या. मुशफीकर रहीमने 49 चेंडूत 23, दासने 36 चेंडूत 19, तमीम इक्बालने 15 चेंडूत 13, मेहदी हसनने 20 चेंडूत 14 आणि तस्कीन अहमदने 32 चेंडूत 10 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज कोलमडले. पहिल्या 10 षटकाअखेर बांगलादेशची स्थिती 2 बाद 33 अशी केविलवाणी होती. त्यानंतर बांगलादेशचे पहिले अर्धशतक 16 व्या षटकांत नोंदविले गोले पण आणखी तीन गडी बाद झाले होते. न्यूझीलंडच्या बोल्टने बांगलादेशच्या तमीमला तसेच सोम्या सरकारला 3 चेंडूच्या अंतराने बाद केले. सरकारला खातेही उघडता आले नाही. बांगलादेशच्या डावातील हे पाचवे षटक होते. बोल्टने आपल्या दुसऱया हप्त्यातील गोलंदाजीमध्ये बांगलादेशचे तस्कीन अहमद आणि हसन मेहमूद यांचे बळी मिळविले. न्यूझीलंडच्या निश्चॅमने बांगलादेशच्या दास आणि रहीम यांना बाद केले. सँटेनरने मिराज आणि मेहदी हसन यांचे बळी मिळविले. हेन्रीने मेहमुदुल्लाला झेलबाद केले.
प्रत्त्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 21.2 षटकांत 2 बाद 132 धावा जमवित विजय नोंदविला. सलामीच्या ग्युप्टील आणि निकोल्स या जोडीने 5.3 षटकांत 54 धावांची भागिदारी केली. ग्युप्टीलने 19 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 38 धावा फटकाविल्या. ग्युप्टील बाद झाल्यानंतर निकोल्स आणि कॉनवे या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 65 धावांची भग घातली. कॉनवेने 52 चेंडूत 27 धावा जमविल्या. निकोल्स आणि यंग यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. आपल्या 50 व्या वनडे सामन्यात खेळताना निकोल्सने 53 चेंडूत नाबाद 49 तर यंगने 6 चेंडूत नाबाद 11 धावा जमविल्या.
बांगलादेशतर्फे तस्कीन अहमद आणि मेहमूद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलीयमसन तसेच रॉस टेलर आणि टीम साऊदी खेळू शकले नाहीत. संघाचे नेतृत्व लेथमकडे सोपविण्यात आले होते. लेथमचा हा 100 वा वनडे सामना होता. त्याचप्रमाणे बांगलादेशला अष्टपैलू शकीब अल हसनची उणीव भासली. अलीकडेच बांगलादेशने या दौऱयापूर्वी आपल्या मायदेशातील कसोटी मालिकेत विंडीजचा 3-0 असा पराभव केला होता.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 41.5 षटकांत सर्वबाद 131 (मेहमुदुल्ला 27, रहीम 23, दास 19, मेहदी हसन 14, तमीम इक्बाल 13, तस्कीन अहमद 10, बोल्ट 4-27, निश्चॅम 2-27, सँटेनर 2-23, हेन्री 1-26)
न्यूझीलंड 21.2 षटकांत 2 बाद 132 (निकोल्स नाबाद 49, यंग नाबाद 11, ग्युप्टील 38, कॉनवे 27, मेहमूद 1-49, तस्कीन अहमद 1-23).