वृत्तसंस्था/ कार्डिफ
यजमान इंग्लंडने पाक विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सलामी दिली. गुरुवारी या मालिकेतील झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. इंग्लंडच्या सकीब मेहमूदला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे सोपविण्यात आले होते. इंग्लंडतर्फे पाच खेळाडूंनी आपले वनडे पदार्पण केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकचा डाव 35.2 षटकात 141 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 21.5 षटकात 1 बाद 142 धावा जमवित हा सामना 9 गडय़ांनी एकतर्फी जिंकला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सकीब मेहमूदने संघात यशस्वी पुनगरागमन करताना 42 धावांत 4 गडी बाद केले.
पाकच्या डावामध्ये फक्र झमानने 67 चेंडूत 6 चौकारासह 47, शदाब खानने 43 चेंडूत 1 षटकारासह 30, शोएब मक्सुदने 32 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19, मोहमद रिजवानने 9 चेंडूत 3 चौकारासह 13 आणि शाहिन आफ्रिदीने 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. पाकच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही. पाकच्या डावात 2 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे सकीब मेहमूदने 42 धावात 4, ओर्व्हटनने 23 धावात 2, पार्किन्सनने 28 धावात 2 तसेच ग्रेगरीने 11 धावात एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात सलामीच्या फिल सॉल्टने 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. त्यानंतर डेव्हिड मलान आणि क्रॉले यांनी दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 120 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला हा सामना आरामात जिंकून दिला. मलानने 60 चेंडूत 8 चौकारासह नाबाद 68 तर क्रॉलेने 50 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 58 धावा झळकविल्या. पाकतर्फे शाहिन आफ्रिदीनने 22 धावात एक बळी मिळविला. या मालिकेतील आता दुसरा सामना शनिवारी लॉर्डस् मैदानावर होत आहे.
संक्षिप्त धावफलक ःपाक 35.2 षटकात सर्व बाद 141 (फक्र झमान 47, शदाब खान 30, शोएब मक्सुद 19, रिजवान 13, शाहिन आफ्रिदी 12, सकीब मेहमूद 4-42, ओर्व्हटन 2-23, पार्किन्सन 2-28, ग्रेगरी 1-11), इंग्लंड 21.5 षटकात 1 बाद 142 (फिल सॉल्ट 7, मलान नाबाद 68, क्रॉले नाबाद 58, शाहिन आफ्रिदी 1-22).









