महाराष्ट्र पत्रकार संघाची पालकमंत्र्यांच्याकडे मागणी
कोकरूड / प्रतिनिधी
वारणावती येथील वन्यजीव कार्यालयामध्ये वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार गणेश माने यांना कार्यालयाचे वनक्षेत्रपाल एन. जे. नलवडे यांनी अपमानास्पद वागणूक दिली असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. या आशयाचे निवेदन महाराष्ट्र पत्रकार संघ सांगलीच्या वतीने पालकमंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, वारणावती येथील कार्यालयामध्ये मणदूर व त्या गावच्या इतर वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थ हे वन्यजीवशी सबंधित असलेल्या विविध अडचणी व समस्याबाबतचे निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी या विषयाचे वार्तांकन करण्यासाठी दै. केसरीचे पत्रकार गणेश माने हे ही ग्रामस्थांसोबत गेले होते. फोटो काढण्यासाठी माने यांनी आपला मोबाईल काढला असता वनक्षेत्रपाल नलवडे यांनी माने यांच्याकडे ओळखपत्र दाखविण्याची मागणी केली. माने यांनी आपले ओळखपत्र दाखविल्यानंतरही मुजोर अधिकारी नलवडे यांनी माने यांना अरेरावीची भाषा करत आपल्या कार्यालयातून हाकलून दिले. एका अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातून एका पत्रकारास अशा पद्धतीने हाकलून बाहेर काढणे हे लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेचा अवमान करणारे आहे.
संबधित मस्तवाल अधिकाऱ्याची शाहूवाडी तालुक्यात केलेल्या भ्रष्टचाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष बिपीन पाटील, संघटक शिवाजी पाटील व अन्य पत्रकार उपस्थीत होते.