प्रत्येक वणव्यांची तपशीलवार चौकशी करण्याचे निर्देश
प्रतिनिधी/ पणजी
राज्याच्या विविध जंगल क्षेत्रात भडकलेल्या 40 वणव्यांवर थेट देखरेख ठेवण्यासाठी 24 तास अखंड कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
दि. 05 मार्च पासून जंगले, खासगी क्षेत्रे, सार्वजनिक जमिनी, बागायती, महसुली जमीन इत्यादींसह विविध भागात वणवे भडकल्याचे आढळले असून त्यांची नोंद करण्यात आली आहे.
वणव्यांच्या या स्थानिक घटनांकडे सर्वोच्च प्राधान्याने लक्ष देण्यासाठी वन खात्याने उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, उत्तर आणि दक्षिण गोवा एसपी यांच्यासह अग्निशामक सेवा संचालनालयासारख्या अन्य खात्यांशी समन्वय साधला आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश देण्यात आले असून घटनास्थळी त्वरित पोहोचण्यासाठी अचूक भौगोलिक निर्देशांक तसेच वणव्यांची ठिकाणे निश्चित करण्यासाठी अक्षांश रेखांकानुसार रियल टाईम नकाशे क्षेत्रीय कार्यकर्त्यांना वितरित केले जात आहेत. 750 हून अधिक लोक यासाठी कार्यरत आहेत.
वनक्षेत्रातील अनधिकृत प्रवेशांवर बंदी, प्रवेश रोखण्यासाठी वन आणि वन्यजीव कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी उपवन संरक्षकांना विशिष्ट निर्देश देखील देण्यात आले आहेत.
आगीच्या घटनांचे युद्धपातळीवर तात्काळ व्यवस्थापन करण्यासाठी पीआरआयसह दोन्ही जिल्हाधिकारी, पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अग्निशामक दल, स्थानिक नागरिक यांची संयुक्त पथके समन्वयाने तैनात आहेत.
जंगलातील वणव्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमांद्वारे प्रतिबंधात्मक आणि नियंत्रण उपायांची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्याशिवाय जंगलातील वणवे प्रतिबंधक उपाययोजना गतीमान करण्यात आल्या असून प्रत्येक ठिकाणच्या वणव्यांची कारणे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वणव्यांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी व वणव्यांवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.
राज्यभरात किती प्रमाणात वणवे लागले आहेत ते शोधण्यासाठी हवाई दल आणि नौदलाचे दोन हेलिकॉप्टर वनक्षेत्राचे नियमित हवाई निरीक्षण करत आहेत. त्याशिवाय जिथे लोक पोहचू शकत नाहीत अशा दुर्गम भागात ड्रोनचा देखील वापर करण्यात येत आहे.
दरम्यान, या वणव्यांमुळे जंगली वनस्पती आणि प्राणी यांच्या जैव विविधते संदर्भातील हानीची अद्यापपर्यंत नोंद झालेली नाही.









