ओढय़ात बुडणाऱया बालकाला वाचविल्याने केले सन्मानित
प्रतिनिधी/ बेळगाव
दोन वर्षांपूर्वी पावसाळय़ात ओढय़ाच्या प्रवाहात वाहून जाणाऱया बालकाला धाडसाने वाचविणाऱया वडेरहट्टी (ता. गोकाक) येथील दोन मुलांना केंद्रिय गृहमंत्रालयाने ‘जीवनरक्षा’ पदक देवून त्यांचा गौरव केलाआहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलांचे कौतुक करण्यात येत आहे.
शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयात सिध्दाप्पा केंपान्ना होसट्टी, शिवानंद दशरथ होसट्टी (दोघेही रा. वडेरहट्टी, ता. गोकाक) या धाडसी मुलांचा सत्कार करण्यात आला. केंद्रिय गृहमंत्रालयाने दिलेले जीवनरक्षा पदक, प्रमाणपत्र व प्रत्येकी 1 लाखांचा धनादेश पोलीस आयुक्तांनी त्यांच्याकडे सुपुर्द केला.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या दोन्ही धाडसी मुलांचा सत्कार करण्यात आला. 8 मे 2018 रोजी गोकाक तालुक्मयातील इंदवेणी ओढय़ाला पावसाचे पाणी आले होते. त्यावेळी एक लहान मुलगा अचानक ओढय़ात पडून प्रवाहात वाहून जात होता. बचावासाठी त्याने आरडाओरड सुरू केली. ही आरडाओरड ऐकून जीवाची परवा न करता सिध्दाप्पा व शिवानंद यांनी पाण्यात उतरुन त्या मुलाला वाचविले होते.
14 नोव्हेंबर 2018 रोजी महिला व बालकल्याण खात्याने या दोन्ही मुलांना होय्सळ आणि केळदी चन्नम्मा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने जीवनरक्षा पदक दिले आहे. शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांचा गौरव करुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.









