डॉक्टर पित्याचा खून करणाऱ्या रवीराजच्या वागण्याने कुटुंब उद्ध्वस्त:
पालकांनीही मुलांचे अतिलाड करणेदेखील आले अंगलट
आता मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता
► प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, समाजामध्ये आपल्याबरोबरच घराण्याचे नावही उज्ज्वल करावे, अशी बहुसंख्य पालकांची अपेक्षा असते. त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. मात्र हीच संधी साधत काही मुले आई-वडिलांनाच या आयुष्यातूनच उठवितात. अशीच घटना अंजनेयनगर येथे घडली होती. डॉक्टर असलेल्या आपल्या पित्याचाच मुलाने खून केला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. चार वर्षानंतर त्या मुलालाही जन्मठेप झाली आणि संपूर्ण कुटुंबाचेच होत्याचे नव्हते झाले.
मयत डॉ. उमाकांत दंडावतीमठ हे एक नामांकित नेत्रतज्ञ होते. त्यांनी केएलई बरोबरच इतर ठिकाणी सेवा बजावली होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यांचा मुलगा रवी ऊर्फ रवीराज हादेखील डॉक्टर व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी त्याला एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी अमाप पैसा खर्च केला. मात्र एमबीबीएस तो झालाच नाही. उलट नेहमीच आई आणि वडिलांना मानसिक त्रास देण्यातच धन्यता मानली.
या घटनेवरून रवी हा एक मानसिक रुग्ण असल्याचेच दिसून येत होते. डॉक्टर व्यवसाय करून त्यांनी संपूर्ण कुटुंबाला सधन बनविले. मुलगीलाही डॉक्टर बनविले. तिचे लग्न करून दिले. ती अत्यंत आनंदात राहत होती. मात्र भाऊ रवी हा आई-वडिलांना त्रास देत असल्यामुळे तिनेही त्याला अनेकवेळा समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र रवी हा कधीच कोणाचे ऐकत नव्हता. केवळ चैनी आणि मौजमजा करणे यातच तो गुंतला होता.
डॉ. उमाकांत हे अंजनेयनगर येथे राहत होते. त्यांचा स्वत:चा बंगला होता तर त्यांनी जमीनही घेतली होती. रवी याचा विवाह झाला होता. मात्र पत्नीने त्याच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपविले होते. असा प्रकार घडूनही रवीच्या वागण्यामध्ये काहीच सुधारणा झाली नव्हती. 31 जानेवारी 2018 रोजी रवी आणि डॉ. उमाकांत यांच्यामध्ये वादावादी झाली. उमाकांत यांनी घेतलेली जमीन विक्री करुया म्हणून रवी याने हट्ट धरला होता. मात्र डॉ. उमाकांत यांनी त्याला नकार दिला. याबाबत त्यांनी आपली मुलगी डॉ. रश्मी यांना याची माहितीदेखील दिली होती.
दुसऱ्याच दिवशी नेहमीप्रमाणे डॉ. उमाकांत हे घरी आले. घरी येताच अचानकपणे रवी याने त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीपूड फेकली आणि त्यांच्यावर पारीने घाव घातला. ही घटना घडल्यानंतर रवीने दरोडा पडला असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. पोलीसही प्रारंभी चक्रावले. मात्र त्यानंतर त्या दिशेने तपास करून रवी याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. त्याने आपण खून केल्याची कबुली दिली.
या घटनेनंतर डॉ. रश्मी यांनाही धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी रितसर पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली आणि आता शिक्षाही झाली. शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून आर. एन. चाटे यांनी काम पाहिले. आता त्याला जन्मठेपची शिक्षाही झाली. मात्र यामध्ये संपूर्ण डॉक्टर कुटुंबच उद्ध्वस्त झाले. ही घटना खरोखरच गंभीर होती. मुलांसाठी आई-वडील सर्वस्व पणाला लावतात. मात्र मुलांच्या वागण्यामुळे आई-वडिलांचे जीवनच संपूर्ण उद्ध्वस्त होते. संपूर्ण कुटुंबच नाहीसे झाले. अशा अनेक घटना घडल्या आहेत. तेंव्हा आता मुलांना मार्गदर्शन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पालकांनीही मुलांचे अतिलाड करणे देखील अंगलट येते. आपल्यासारखाच मुलगा बनावा, अशी अपेक्षा असते. मात्र मुलेच अशाप्रकारे वागत असल्यामुळे मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे.
रवीराज याने केली चोरी
वडिलांचा खून केल्यानंतर त्याला अटक झाली. मात्र त्यानंतर त्याने जामीन मिळविला होता. जामीन मिळाल्यानंतर चैनीसाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने चक्क मंदिरामध्येच चोरी केली होती. पांगूळ गल्ली येथे चोरी केल्यानंतर त्याला मार्केट पोलिसांनी अटक केली होती. एक उच्च शिक्षित कुटुंबातील मुलगा भरकटल्यामुळे कशी परिस्थिती निर्माण होते, हे यावरुन दिसून येते.









