मुंबई \ ऑनलाईन टीम
मोदी मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. पंकजा मुंडे यांनी नाराज नसल्याचे सांगत या चर्चेला पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला. या पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाली व त्यावेळी त्यांचे डोळे पाण्याने डबडबले, त्या काहीशा भावनिक झाल्या. मात्र डोळ्यातील पाणी नकळत बाजूला करत त्यांनी पत्रकांराच्या प्रश्नाला उत्तर दिले.
पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसोबतची एक आठवण सांगितली. म्हणाल्या, प्रीतमताई लोकसभेला निवडून आल्या. मला वाटत मुंडे साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा मी एकटीच होते, आमचा एकही आमदार नव्हता, माझ्या पायाला फोड आले होते, मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला, असं सांगत असताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचं दिसून आलं. प्रीतमताई निवडणुकीला ज्या उभ्या राहिल्या त्या बापाच्या मृत्यूनंतर उभ्या राहिल्या. त्यामुळे त्या रेकॉर्डब्रेक करणार होत्या. पण आता जी निवडणूक त्या जिंकल्या त्या त्यांच्या मेरीटवर जिंकल्या. तरीही ती प्रीतमताई निवडणुकीच्या उमेदवार राहणार नाहीत, अशा चर्चा होत्या. आम्ही जे कष्ट केलेत ते पक्षासाठी केलेत. माझ्याकडे येणारी गर्दी पक्षासाठी आहे ती वेगळी आहे, असं कोणी म्हणत असेल तर मी मात्र तसं म्हणणार नाही. पक्षामध्ये जे अॅडिशन झालं त्यामुळे एक जर मत वाढलं तरी ते समाधानाची बाब आहे, असं पंकजा मुंडे हे सर्व सांगत असताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीनं भावूक झाल्या होत्या.
दरम्यान, २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं. मात्र, खासदारकीची शपथ घेण्याआधीच त्यांचं अपघाती निधन झालं. याविषयी बोलताना देखील पंकजा मुंडेंना गहिवर अनावर झाला. “मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि ३ जूनला ते गेले. गंमतीचा भाग असा आहे की माझ्या आईला पेन्शन मिळते. पण मुंडे साहेबांच्या शेवटच्या टर्मची मिळत नाही. कारण त्यांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती. ते शपथ घेण्याआधीच गेले. १७ दिवसांत ते गेले. हे केवढं मोठं घोर दु:ख आहे. प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या. त्या लोकांना शांत करण्यासाठी आल्या, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
विधान परिषद आणि राज्य सभा निवडणुका झाल्या त्यावेळी नवनवी लोकं आली आहेत त्यामुळे पक्षाची ताकद वाढेल असं नेत्यांना वाटतं असेल तर त्या भावनेचा सन्मान करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला सन्मान करणारी कार्यकर्ता आहे. पक्षनिष्ठा ही माझ्या बापानं मला संस्कारात दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी केंद्रात नेतृत्त्व करत होते. त्यावेळी मुंडे महाजन राज्यात नेतृत्व करत होते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची संस्कृती काढणं आमच्या संस्कृतीत बसत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Previous Articleकृषी पर्यवेक्षक वसंत भिल यांचे निधन
Next Article साताऱ्यात अट्टल चोरटा जेरबंद








