ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार देवदर्शन, धार्मिक उत्सवात सहभागास मनाई ,रस्त्याच्या प्रश्नावर पद गेलेल्या लोकप्रतिनिधींची मनमानी
वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुक्यातील वडवली गावातील रस्त्याच्या कामावरून कोकण आयुक्तांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांवर बरखास्तीची कारवाई केल्याच्या रागातून गावातील मांडवकरवाडी, चौरेवाडी, बौध्दवाडी, चव्हाणवाडी व पाटीलवाडीतील लोकांवर दबाव, दहशत व बहिष्कार टाकण्यात आल्याची तक्रार या वाडीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
वडवली गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वडदहसोळ पक्की सडक या प्रश्नी ग्रामपंचायतीने उचित कार्यवाही न केल्याने कोकण आयुक्तांनी ग्रामपंचात बरखास्तीची कारवाई केली. त्यामुळे तेथील प्रस्थापित व सरपंचांनी गावातील अन्य काही लोकांना हाताशी धरून मांडवकरवाडी, चौरेवाडी, बौध्दवाडी, चव्हाणवाडी व पाटीलवाडीतील लोकांवर अत्याचार करायला सुरूवात केल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात या वाडीतील एका ग्रामस्थाच्या लग्नावरच या मंडळींनी बहिष्कार टाकला. या वाडीतील एका घराचे काम करणासही प्रस्थापितांनी प्रतिबंध केला. या वाडय़ांतील नागरिकांना देव कार्यात सामावून घेतले जात नाही. रस्त्याची मागणी करणाऱया एका नागरिकाला तो देव दर्शनासाठी चालला असता चक्क गाडीतून उतरवण्यात आले. दरवर्षी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येतो, मात्र या उत्सवाला सुध्दा या वाडय़ांना निमंत्रण देण्यात आलेले नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निव्वळ रस्त्याची मागणी केली व त्याबाबत दाद मागितली म्हणून या पाच वाडय़ांवरती विविध प्रकारे अन्याय होत असल्याचे म्हणणे मांडण्यात आले आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून प्रस्थापितांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱयांनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर नारायण मांडवकर, पांडूरंग म्हादये, दत्ताराम म्हादये यांच्यासह सुमारे 40 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱया आहेत.









