प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या काळात ही विनापरवाना जळाऊ लाकडाची वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाच्या फिरत्या पथकास मिळाली.त्यावरून दि.8रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वडजल(ता.फलटण)गावच्या हद्दीत जळाऊ लाकूड वाहतूक करणारा ट्रक आढळून आला.पथकाने कारवाई करून साडेसात लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.या प्रकरणी योगेश सुखदेव ढोले (रा.हिंगणे ता.खटाव)याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 08रोजी सातारा वनविभागाचे फिरते पथक रात्रगस्त करीत असता त्यांना लोणंद – फलटण रस्त्यावर वडजल (ता.फलटण) गावच्या हद्दीत पहाटे 4.00 वाजता ट्रक क्र. (श्प्04 Aथ्1292) हा जळावू लाकूड घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले.पथकाने चौकशी केली असता विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी वाहनासह लाकुडमाल असा अंदाजे 7.50 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.योगेश सुखदेव ढोले (रा.हिंगणे ता.खटाव) याच्या विरूध्द भारतीय वन अधिनियमप्रकरणी 1927 चे कलम 41 2(ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई वन परीक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांनी वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड़, विजय भोसले यांच्या सोबतीने पार पाडली.
कोविड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन सुरू असताना देखील काही गैरप्रवृत्ती निसर्गाची हानी करण्यात व्यस्त आहेत. अवैध वृक्षतोड, वनोपजाची अवैध वाहतूक, वन्यप्राण्यांची शिकार, वनांना वणवा लावणे अशी पर्यावरण विघातक कृत्ये करणायांवर वनकायद्यान्वये कारवाई केली जाईल.तसेच असे लोक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कलमान्वये पोलीस कारवाईस देखील पात्र असणार आहेत, अशी माहिती वन परीक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांनी दिली.








