प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून स्मार्ट बनविण्यात येत आहेत. मात्र वडगाव-शहापूर परिसराला जोडणाऱया लक्ष्मी गल्ली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पण या रस्त्याच्या विकासाकडे महापालिकेसह स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून रस्त्याचा विकास करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
शहापूर नाथ पै चौकातून वडगावला जाण्यासाठी वडगाव पोलीस स्टेशनसमोरील रस्त्याचा अवलंब केला जातो. या रस्त्यावरून असंख्य वाहनधारक ये-जा करीत असतात. या रस्त्याची रुंदी शंभर फूट असून या भागातील हा मोठा रस्ता आहे. तसेच या रस्त्यामार्गे हिंदवाडी आणि शहापूर स्मशानभूमीला देखील जाता येते. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पण हा रस्ता महत्त्वाचा असूनदेखील विकासापासून वंचित आहे.
वडगाव-शहापूर, टिळकवाडी अशा विविध भागातील रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला. पण या रस्त्याच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावर एका बाजूला पोलीस स्टेशन तर दुसऱया बाजूला शाळा आहे. त्यामुळे रस्त्याचा विकास करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून रस्ता खराब झाला आहे. परिणामी रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. त्यामुळे या रस्त्याचा विकास करणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करून रस्त्याचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.









