पटणा – बिहार येथे जाऊन मुलाला आणले परत
प्रतिनिधी/ पणजी
घटस्फोटासाठी बापानेच आपल्या भावाच्या मदतीने 7 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याला पटणा बिहार नजीक आपल्या मूळ गावात ठेवले. त्या मुलाच्या आईच्या तक्रारीला पोलिसांनी दाद दिली नाही मात्र महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विद्या गावडे यांनी दोघा वकिलांना बिहार येथे पाठवून त्याला मुलाला त्यांच्या मातेच्या स्वाधीन करण्यास यश मिळवले. मुलाचा ताबा घेण्यासाठी गुंडांशीही दोन हात करणाऱया वकिलांची सर्वत्र स्तुती होत आहे. ऍड. शैलेश कुलकर्णी आणि ऍड. दत्तप्रसाद पोकळे या दोघांच्या धाडसामुळे आज त्या मुलाला मातृत्व परत लाभले.
आयटी क्षेत्रात वावरणाऱया व बार्देश तालुक्यात राहाणाऱया या जोडप्यामध्ये वाद होता. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. एक दिवस त्या महिलेच्या दिराने बिहार येथून येऊन त्या मुलाला जबरदस्तीने घरातून नेले.
वकिलांनी महिलेसह गाठले बिहार
आपला मुलगा परत मिळावा म्हणून तिने पोलिसांतही तक्रार दिली पण मुलाच्या वडिलाने मुलगा आपल्या ताब्यात आहे व हा कौटुंबिक वाद असल्याचे सांगून फौजदारी खटला मिटवला. पोलीसही त्या महिलेच्या विरोधात गेले. शेवटी ती महिला आयोगाच्या पायऱया चढली. आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विद्या गावडे यांनी तिच्याकडून लेखी तक्रार घेऊन सदर महिलेला ऍड. शैलेश कुलकर्णी आणि ऍड. दत्तप्रसाद पोकळे यांच्यासोबत पटणा बिहार येथे पाठविले व गोडीगुलाबीने तिच्या सासरच्या कुटुंबियांना समजावून मुलाला ताब्यात घेऊन परत आणण्याची जबाबदारी दिली.
सासरच्यांनी महिलेला केले कैद, गुंडांची फौज
सदर महिला वकिलांना घेऊन पटणा नजीकच्या त्या गावात आपल्या सासरी पोहोचली व आयोगाचा आदेश सादर केला. पण त्या आदेशाला न जुमानता त्या महिलेच्या दिराने तिला घरातल्या खोलीतच बंद करुन ठेवले. घराबाहेर गुंडांची फौजही बोलावली पण हे दोघे वकील त्यांना सामोरे गेले. त्यांना समजावण्याच्या प्रयत्नात पूर्ण रात्र गेली.
पटणा पोलिसांनी केले हात वर, वकिलांनी सोडली नाही जिद्द
पहाटे त्या महिलेचा पती गोव्यातून पटणाला पोहोचला. पटणातील परिस्थितीची माहिती मिळताच डॉ. विद्या गावडे यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कार्यालयाची मदत घेतली व पटणाचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधून सूत्रे हलविली. पटणा पोलीस त्या महिलेच्या सासरी पोहोचले. पोलिसांनाही सासरच्या लोकांनी दाद दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी दोघाही वकिलांना रिकामी हाताने परत जाण्याचा सल्ला दिला. पण या दोघांनी जिद्द सोडली नाही. घरात बंद करुन ठेवलेल्या त्या महिलेला सोडविण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला.
निव्वळ समुपदेशाने आई, मुलाला सुखरुप आणले गोव्यात
अनेक महिन्यानंतर आईची भेट झाल्याने पोरका झालेला मुलगाही आईला सोडायला तयार नव्हता. तेथील स्थानिक पोलिसांची मदत न घेता निव्वळ समुपदेशनाने त्या महिलेच्या पतीचे आणि सासरच्या कुटुंबियांचे मन वळवून दोघाही वकिलांनी महिला व मुलासह विमानाने गोवा गाठले व सुटकेचा निःश्वास सोडला.
महिला आयोगावरील विश्वास होणार दृढ ः ऍड. कुलकर्णी
बिहार राज्यात जाऊन तेथील समस्यांचा सामना करुन मुलाला त्याच्या मातेच्या ताब्यात देण्यात यश आल्याने गोवा महिला आयोगावरील विश्वास जनतेमध्ये अजूनही दृढ होणार असल्याचे मत ऍड. शैलेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
गोव्यात कौटुंबिक न्यायालयाची गरज ः ऍड. पोकळे
कोर्ट कचेऱया व पोलीस फौजदारी खटले न करता महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक घटस्फोट मिटवले जाऊ शकतात. महिलांना त्यांचा हक्क व न्याय दिला जाऊ शकतो, असे मत फोंडा येथील ऍड. दत्तप्रसाद पोकळे यांनी व्यक्त केले. गोव्यात कौटुंबिक न्यायालयाची अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त करताना या मोहिमेचा एक भाग होण्याची संधी दिल्यामुळे त्यांनी महिला आयोगाचे आभार मानले.