कामाला उशीर केल्याने अधिकाऱयांचा पुष्पहार घालून सत्कार
प्रतिनिधी / बेळगाव
न्यायालयात खटला समेट झाल्यानंतर खटल्याचा निकाल जोडून संबंधित व्यक्तीच्या मालमत्तेवर नाव नोंदविण्यासाठी रितसर अर्ज करण्यात आला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी याबाबत महापालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र, तब्बल 1 वर्ष होत आले तरी त्याबाबत काहीच दखल घेतली नाही. त्यामुळे अक्षरशः अधिकाऱयांच्या या प्रकारामुळे वैतागलेल्या कुटुंबीयांनी व वकिलांनी सत्कार करून आभार व्यक्त केले. याचे सोयरसुतक अधिकाऱयांना नसल्याचे दिसून आले.
बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱयांनी संबंधित क्यक्तीच्या वारसांना चलन देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे वकिलांनीही गांधीगिरी करत तुम्ही फारच लवकर काम केलात, याबद्दल पुष्पहार घालून सत्कार करतो म्हणून ‘त्या’ अधिकाऱयांचा सत्कार केला. या प्रकारामुळे सरकारी कार्यालयांमध्ये दिवसभर त्याची जोरदार चर्चा सुरू होती.
फुलबाग गल्ली बेळगाव येथील यल्लाप्पा मोहिते यांचे निधन झाले आहे. त्यांची पत्नी अनिता मोहिते यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून त्या ठिकाणी तो खटला निकालात काढला. त्यानंतर महापालिकेच्या महसूल विभागाकडे रितसर अर्ज केला. अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत ते काम पूर्ण झाले पाहिजे. मात्र, त्यासाठी तब्बल एक वर्ष घेण्यात आले. या एका वर्षामध्ये या कामासाठी अनिता आणि त्यांचे वकील ऍड. लक्ष्मण पाटील यांनी 30 ते 40 वेळा हेलपाटे मारले. मात्र, अधिकाऱयांना थोडीशीही चाड आली नाही. विनंती करून अक्षरशः हे कुटुंबीय वैतागले.
त्यानंतर ऍड. लक्ष्मण पाटील यांनी या अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे बुधवारी तुम्हाला चलन देतो, असे सांगितले. मात्र, ऍड. लक्ष्मण पाटील यांनी या प्रकाराविरोधात गांधीगिरी करून सरकारी अधिकारी कसे काम करतात हे जनतेला दाखवून दिले. बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, नेहमीच सरकारी कार्यालयातील अधिकाऱयांविरोधात आवाज उठविणारे ऍड. अमृत कोल्हाटर, ऍड. दयानंद चौधरी,
ऍड. कलमेश मायण्णाचे, ऍड. बबन गुरव हार घेऊनच कार्यालयात दाखल झाले.
जुन्या महानगरपालिकेच्या कार्यालयात असलेल्या प्रभाग क्र. 30 मधील महसूल विभागाचे प्रथम श्रेणी अधिकारी तळकेरी यांचे आधी पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्याच विभागातील अब्दुल सनदी यांचा देखील तोच पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. यावेळी या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. ऍड. लक्ष्मण पाटील यांनी या अधिकाऱयांच्या कारनाम्यांचा गांधीगिरीने अशी चपराक मारल्याने सारेजण खजील झाले. मात्र याबद्दल या वकिलांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’, असा प्रकार पावलोपावली नागरिकांना जाणवत असतो. वकिलांनाच अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्नही उपस्थित होतो. बुधवारी झालेल्या या प्रकारानंतर तरी आपल्या कामामध्ये बदल करून जनतेची तत्परतेने कामे करणार का, हे आता पाहावे लागणार आहे. जुन्या महापालिकेच्या कार्यालयामध्ये अशाप्रकारे सत्कार झाल्याने दिवसभर याबाबत जोरदार चर्चा सुरू होती.
अधिकारी लक्ष देणार का?
अपघातात मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीला मालमत्तेवर नाव दाखल करण्यासाठी वर्षभर पळापळ करावी लागली, ही खरोखरच अत्यंत खेदाची बाब आहे. याबाबत आता महापालिका अधिकारी आणि जिल्हाधिकारी लक्ष देणार का? असा सवालही उपस्थित होत आहे.









