गुजरातमधील अतुल रेल्वेस्थानकाजवळ घटना ः दर्शनी भाग तुटला
अहमदाबाद / वृत्तसंस्था
देशातील सर्वात वेगवान रेल्वे ‘वंदे भारत’ शनिवारी पुन्हा एकदा दुर्घटनेची शिकार झाली. गुजरातमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला असून, मुंबईहून गांधीनगरकडे जाणाऱया रेल्वेसमोर बैल आदळला. धडकेमुळे रेल्वेचा पुढील भाग तुटला. मात्र, काही वेळ थांबल्यानंतर ही गाडी पुन्हा रवाना करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये वंदे भारतने आतापर्यंत तीनवेळा गुरांना धडक दिली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस वलसाडमधील अतुल रेल्वेस्थानकावरून जात असताना सकाळी 8.17 वाजता ही घटना घडली. स्थानकातून रेल्वे निघाल्यानंतर काही वेळातच एक बैल त्याच्यासमोर आला. या धडकेमुळे गाडीचा पुढील भाग तुटला. घटनेनंतर रेल्वे जवळपास 26 मिनिटे स्टेशनवर उभी होती. दुरुस्तीनंतर ती रवाना करण्यात आली.
महिन्यात चारवेळा दुर्घटना
अलीकडेच 22 दिवसांपूर्वी 7 ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस गायीला धडकली होती. तर 6 ऑक्टोबरलाही अहमदाबाद रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्स्प्रेस टेनची म्हशींच्या कळपाशी टक्कर झाली होती. या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झाला. तसेच वंदे भारत एक्स्प्रेस गाडीचा पुढील भाग तुटला होता. 8 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱया वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अचानक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेची चाके जाम झाल्यामुळे गाडी सुमारे 5 तास खुर्जा स्थानकावर थांबली. त्यानंतर प्रवाशांना शताब्दी एक्स्प्रेसने पुढे रवाना करण्यात आले होते.
देशातील पहिली हायस्पीड ट्रेन
देशातील पहिली हायस्पीड ट्रेनवंदे भारत एक्स्प्रेस सध्या तीन मार्गांवर धावत आहे. दिल्ली ते वाराणसी, दिल्ली ते कटारा आणि गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई अशी वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू झाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. तिची वेग मर्यादा 180 किमी प्रतितास आहे. येत्या काही महिन्यांत ती ताशी 200 किलोमीटर वेगाने धावण्यास सुरुवात होईल.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यात रिक्लाइनिंग सीट बसवण्यात आल्या आहेत. त्यात स्वयंचलित फायर सेन्सरची व्यवस्था करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधेसह अपग्रेड केलेल्या टेनमध्ये तीन तासांचा बॅटरी बॅकअपही आहे.









