प्रतिनिधी/ बेळगाव
एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर आरोग्य विभागातील अधिकारी कोणाच्या संपर्कातून लागण झाली आहे, याची चौकशी करतात. 15 ते 20 दिवसांत ते कोणत्या गावाहून परतले आहेत, याची ट्रव्हल हिस्ट्री तपासली जाते. कसलीही ट्रव्हल हिस्ट्री नसलेल्या वंटमुरी कॉलनी येथील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये या संबंधिची माहिती दिली आहे. वंटमुरी कॉलनी येथील रुग्ण क्रमांक 10626 या 30 वषीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या शुक्रवारी 311 वर पोहोचली आहे. यापैकी 299 जण कोरोनामुक्त झाले असून सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 19 जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या आणखी एका बाधिताला घरी पाठविण्यात आले आहे.
वंटमुरी कॉलनी येथील 30 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास सुरू झाला. ताप, सर्दी व खोकल्याचाही त्रास सुरू होता. त्यामुळे ती उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आली होती. स्वॅब तपासणीनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अशा प्रकरणांमुळे आरोग्य विभागाने तपासणी वाढविली आहे. केवळ लक्षणे असणाऱयांचीच नव्हे तर सरसकट तपासणी वाढविण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. जिल्हय़ात रोज 700 ते 800 जणांचे स्वॅब जमविण्यात येत आहे. या दोन ते तीन दिवसांत सुमारे अडीच हजारांहून अधिक स्वॅब जमविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
सरसकट स्वॅब तपासणीची मोहीम
बेळगाव शहरातील रामनगर, रुक्मिणीनगर, वडगावसह अनेक ठिकाणी सरसकट स्वॅब तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचप्रमाणे जिल्हय़ातही तपासणी वाढविण्यात आली आहे. वंटमुरी कॉलनी येथील 30 वषीय महिलेला कोरोनाची लागण कशी झाली? याचा तपास करण्यात येत आहे. जर कोणाच्याही संपर्कातून लागण झालेली नाही तर समुदायाला लागण सुरू झाली आहे का? असा संशय बळावत चालला आहे. त्यामुळेच सरसकट तपासणी वाढविण्यात आली आहे.









