- महा आवास अभियानांतर्गत विभागस्तरीय पुरस्कारांचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते वितरण
ऑनलाईन टीम / पुणे :
कुठलीही व्यक्ती घरविहीन राहता कामा नये असे देशाचे पंतप्रधान यांचे स्वप्न आहे. भारत हा प्रगतीशील देश असून देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. कोणत्याही राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय योजना राबवितांना महाराष्ट्र मागे राहत नाही. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे पुणे विभागातील काम कौतुकास्पद आहे, असे उद्गार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढले.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील ‘महा आवास अभियान ग्रामीण’ अंतर्गत उत्कृष्ट काम करणा-या जिल्हयांना विभागीय आयुक्त कार्यालयात पुरस्कार वितरण करण्यात आले, त्यावेळी राव बोलत होते.
राव पुढे म्हणाले, पुणे विभाग हा सर्वात जास्त प्रगत विभाग आहे. विभागातील विकासाची चाके थांबली की इथल्या माणसाला अस्वस्थ, चुकल्यासारखे वाटते. पुणे विभागाची कार्यसंस्कृती वेगळी आहे. इथे जनप्रतिनिधी व स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे एकत्र येऊन काम करतात. पुणे विभागाला कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वात जास्त सामना करावा लागला. केरळ राज्यातील परिस्थिती पाहता तिस-या लाटेचे सावट आपल्याला दिसत आहे. तिस-या लाटेच्या प्रादुर्भाव झाला तर परिस्थिती कशी हाताळता येईल याविषियीची काळजी आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणा तयार आहेत.
या योजनेत सहभागी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पाटण तालुक्यातील पूरपरिस्थिती सारख्या संकटांवर मात करुन चांगले काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सर्व पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदा, तालुके व ग्रामपंचायतींचे कौतुक करुन अभिनंदन केले.








