विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची पाहणीनंतर मागणी, भाजप सरकारचे बेगडी देशप्रेम उघड झाल्याची टीका
प्रतिनिधी /मडगाव
भाजप सरकार देशात जे काही घडले ते 2014 नंतरच अशा भ्रमात राहून ऐतिहासिक स्थळे व खुणा नष्ट करत आहे. मडगावच्या ऐतिहासिक लोहिया मैदानाला शुक्रवारी भेट दिल्यानंतर तेथील डॉ. राम मनोहर लोहियांचा पुतळा व हुतात्मा स्मारक गायब झाल्याचे पाहून मला धक्काच बसला. या घटनेने भाजपचे बेगडी देशप्रेम परत एकदा उघडे पडले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित या घटनेची दखल घेऊन सदर पुतळा व स्मारक शोधून काढण्याचे आदेश द्यावेत व ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
मडगावचे आमदार कामत यांनी शुक्रवारी लोहिया मैदानावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तेथून पुतळा व स्मारक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब नगरपालिका अभियंता दिनीज डिमेलो व कनिष्ठ अभियंता विराज बोडनेकर यांना बोलावून घेतले व सदर पुतळा तसेच हुतात्मा स्मारकाचा ठावठिकाणा शोधण्याचे स्पष्ट आदेश दिले. सरकारने सदर पुतळा व स्मारक सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याचे कामत म्हणाले.
सरकारच्या पुरातत्व खात्याने अशा ऐतिहासिक स्थळांची व तेथे असलेले पुतळे, स्मारके, नामफलक यांची दखल घेणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच गोवा मुक्तीसाठी योगदान व सर्वस्व दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रती तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती भाजप सरकारला आदर नसल्याचे परत एकदा स्पष्ट झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. गोव्याच्या मुक्तीचा हीरकमहोत्सव साजरा करताना 19 डिसेंबर, 2020 रोजी सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना सदर सोहळय़ाचे साधे निमंत्रण दिले नव्हते, याची आठवण त्यांनी करून दिली.
आमचे नेते राहुल गांधी यांनी परवाच जालियानवाला बाग येथे भाजप सरकारने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तेथील ऐतिहासिक खुणाच कशा नष्ट केल्या आहेत त्याचा पर्दाफाश केलेला आहे, याकडे कामत यांनी लक्ष वेधले. भाजपला देशासाठी बलिदान दिलेल्यांप्रती कसलाच आदर नसल्याचा आरोप कामत यांनी केला. भाजप केवळ उत्सव साजरे करून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
कामाला गती द्यावी
मडगावच्या ऐतिहासिक लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण लवकरात लवकर पूर्ण करून 19 डिसेंबर, 2021 रोजी गोवा मुक्तीची 60 वर्षे साजरी करताना देशप्रेमांना तेथे आदरांजली वाहण्याची संधी देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने संथगतीने चाललेल्या या कामाला आता गती देणे गरजेचे आहे, असे कामत म्हणाले.
पुतळा, स्मारक ‘जी-सुडा’च्या सल्लागाराने नेलेत : मुख्याधिकारी
लोहिया मैदानावरील पुतळा व स्मारक जी-सुडाच्या सल्लागाराने नेलेले असून सदर पुतळय़ाची व स्मारकाची पॉलिशिंग व अन्य कामे करायची आहेत. सौंदर्यीकरणाची कामे झाल्यानंतर ते पालिकेकडे सुपूर्द केले जाईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे, असे मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुतळा व स्मारक गायब झाल्याचे जे दावे केले जात आहेत त्यात तथ्य नसल्याचे दिसून येत आहे. नीट अभ्यास न करता हे दावे करण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.









