प्रतिनिधी / काणकोण
लोलये पंचायत क्षेत्रात बिबटय़ाने धुमाकूळ घातला असून घराच्या ओसरीवर बांधलेल्या पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडायला सुरुवात केली आहे. आगस येथे मागच्या आठवडय़ात 10 ते 12 कुत्र्यांचा फडशा पाडण्यात आला असून आपल्या पाळलेल्या 2 कुत्र्यांना या बिबटय़ाने मारून टाकले असल्याची माहिती आगस येथील अशोक प्रभुगावकर यांनी दिली. अभयारण्य विभागाकडे तक्रारी केल्यानंतर बिबटय़ांचा बंदोबस्त केला जात असला, तरी बहुतेकांना जवळपासच सोडून देण्यात येते. सध्या भगवती पठारावर अशा बिबटय़ांची संख्या वाढलेली असून दिवसाढवळय़ा ते दर्शन देऊ लागले आहेत, अशा तक्रारी आहेत. पैंगीण गावात देखील वारंवार बिबटय़ाचे दर्शन घडू लागले असून रस्त्यावरून फिरणे देखील धोक्याचे बनले असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.









