श्रीकृष्णाला ओवाळून अनेक सुवर्ण मुद्रा याचकांना देण्यात आल्या. ते तृप्त झाले आणि पुढे याचना करायचे विसरले. ज्याच्या हातात ओवाळणी पडत होती तो कृष्णाकडे कृतज्ञतेने पाहत होता. कृष्णाचे गुणगान करत होता. त्याचे मागणे खुंटले होते. नवरी रुक्मिणीची ओवाळणी ज्यांना वाटली त्यांना विषयसुख पदरात पडले, पण तृष्णा अधिकच वाढली. ते पुनः पुन्हा मागणी करू लागले.
न सुटती अभिलाषाच्या गाठी । सोडूनि देतां कांपती मुष्टी ।
मागुती लोलंगता दृष्टी । कवडीसाठीं झोंबती ।
त्यागितां जीर्ण देहाचें वास । दाते होती कासाविस ।
न सरे मागत्याची आस । त्यातें बहुवस वानिती ।
पाहतां अत्यंत जर्जर झालें । दिसे नवांठायीं तरकेलें ।
पाहिजे अविमुक्ती त्यागिलें । वायां गेलें दो दिसां ।
ऐकोनि त्यागाची भात । अधोमुख होय गृहस्थ ।
लोभ न संडी पोटाआंत । क्रोधें निंदित शिकविल्या ।
तुम्हीं कैसेनि त्याग केला ।
शिकवू आलेती पुढिलांला । आम्ही नायकों तुमच्या बोला । म्हणोनि रुसला त्यागासी । त्याग नोहे नोवरीपक्षीं । देखोनि हांसिजे मुमुक्षीं ।
कृष्णवऱहाडी अतिदक्षी । त्याग विषयीं उद्भट ।
नवरीच्या ओवाळणीच्या मुद्रा ज्यांना मिळाल्या त्यांची इच्छापूर्ती होईना. मुद्रिका धरलेली मूठ उघडेना. कवडीसाठी ते झोंबू लागले. जीर्ण देह सोडता सोडवत नाही. नऊ ठिकाणी फाटलेला, अत्यंत जर्जर झालेला हा नाशिवंत देह सोडावाच लागेल. हे माहीत असताना सुद्धा सोडताना जीव कापतोच ना? तसा त्यागाचा उपदेश ऐकताच लोभी गृहस्थ मान खाली घालतो, लोभ पोटात शिल्लक राहतो आणि क्रोध प्रकट होतो. त्याग शिकवणाऱयाची तो निंदा करू लागतो. तुम्ही कसला त्याग केलात? तुम्ही आम्हाला शिकवणारे कोण? आम्ही तुमचे ऐकणार नाही, असे म्हणून तो रुसून बसतो. नवरी पक्षाकडे त्याग नाही हे पाहून कृष्ण पक्षातील दक्ष मुमुक्षू हसू लागले. त्यांना त्यागाविषयी अत्यंत आदर होता.
कृष्ण घेऊनि नाचतां । बोध शिणला तत्त्वतां ।
हळूच उतरूनि कृष्णनाथा । होय निघता लाजोनी ।
अभिमान पैं नोवरी । कांहीं केल्या न उतरी ।
पळे उठी पळे दूरी । लाज न धरी सभेची ।
त्यासी धरूं धांविन्नले एक । नोवरि घेऊनि पळे देख ।
कोंडूं जातां अधिकाधिक । ठकूनि लोक तो पळे।
त्यासी संतीं केली विधी ।
हळूचि आणिला सोहंबुद्धी । तेही सांडुनि त्रिशुद्धी । नोवरी संधी उतरली ।
कृष्णाला खांद्यावर घेऊन नाचता नाचता बोध दमला शिणला. त्याने हळूच कृष्णाला खांद्यावरून खाली उतरवले आणि तो लाजून निघून गेला. नवरीला खांद्यावर घेतलेला अभिमान मात्र काही केल्या नवरीला खाली उतरेना. कुणाचीही लाज न धरता तो सभेमध्ये नवरीला खांद्यावर घेऊन इकडे तिकडे धावू लागला. त्याला धरायला लोक धावले तर हा नवरी खांद्यावर घेऊन जास्तच वेगाने पळू लागला.
Ad. देवदत्त परुळेक








