दिवाळीच्या उंबरठय़ावर एक चांगली बातमी वाचायला मिळाली. कोरोनाच्या त्याच त्याच नकारात्मक बातम्या आणि राजकारणातील हमरीतुमरीच्या बातम्या वाचून-ऐकून कंटाळलेल्या मनाला थोडा दिलासा लाभला. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले की महाराष्ट्रातले लोणार सरोवर हे रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. ‘रामसर पाणथळ’ किंवा ‘रामसर वेटलँड’ म्हणजे काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. इराणच्या कॅस्पियन समुद्राच्या किनाऱयावर रामसर नावाचे एक शहर आहे. 1971 साली तिथे युनेस्कोच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. जगभरातील पाणथळीच्या जागांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा परिषदेत ठराव झाला. हाच ठराव ‘रामसर ठराव’ म्हणून ओळखला जातो. भारतासह 170 देशांचा या ठरावाला पाठिंबा आहे.
पाणथळीच्या जागा या नैसर्गिक जलचक्राचा महत्त्वाचा घटक असतात. त्यात मिठागरे, खारफुटीची जंगले, प्रवाळाची बने, खाजण तलाव वगैरेचा समावेश होतो. या ठिकाणी जैवविविधता आढळते. एकपेशीय वनस्पती, सजीवांच्या दुर्मिळ प्रजाती, खारपर्णी, प्राणवायू निर्माण करणाऱया व साठवणाऱया वनस्पती, शेवाळी, वनस्पती आणि गोडय़ा-खाऱया पाण्यात जगणारे असंख्य दुर्मिळ सजीव, पशू, पक्षी यांनी पाणथळीच्या जागा समृद्ध झालेल्या असतात. या जागा आपले पर्यावरण आणि पर्यायाने मानवी जीवन सुरक्षित राखतात. पावसाच्या किंवा अतिवृष्टीच्या पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ या जागा सामावून घेतात, त्यातील जीवनोपयोगी घटक अलग करून सजीवांना उपलब्ध करून देतात, पाणी शुद्ध ठेवतात. पाणथळीच्या जागांमुळे काही ठिकाणी जमिनीची धूप रोखली जाते. अशा रीतीने या पाणथळी मानवासह इतर अनेक सजीवांच्या सुरक्षित जगण्याला साह्यभूत होत असतात. त्यामुळे त्यांचे संवर्धन आवश्यक आहे. या भागातील पाण्याचा आणि वाळूचा उपसा, बेकायदा बांधकामांसाठी होणारी वृक्षतोड आणि नैसर्गिक साधनसामुग्रीचा विध्वंस टाळणे गरजेचे आहे. रामसर कराराप्रमाणे ते त्यात सामील झालेल्या देशांवर बंधनकारक देखील आहे. इंग्लंडमध्ये अशा सर्वात जास्त संरक्षित पाणथळी आहेत. भारताच्या विविध प्रांतांमधील 31 जागांना यापूर्वीच रामसर पाणथळीचा दर्जा मिळाला आहे. आता त्यात लोणार सरोवराची भर पडली आहे. त्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून देखील लोणार सरोवराचे महत्त्व वाढणार, हे निश्चित.








