ज्या लोकांमध्ये प्रतिभा, अर्थात टॅलंट असते, ते कोणत्या प्रसंगामुळे किंवा कशा प्रकारे उत्तेजित होईल, ते सांगता येणे कठीण आहे. दिल्लीतील याचना बन्सल नामक 40 वर्षांच्या शिक्षिकेचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. चवदार आणि चटकदार लोणची बनविण्यात तिचा हातखंडा आहे. तथापि, आपल्या या पाककौशल्याचा व्यवसाय करावा आणि पैसे कमवावेत, असे तिला कधी वाटले नव्हते. तथापि, अनेकजणांनी केलेली तिच्या लोणच्यांची स्तुती ऐकून दिला लोणची आणि तत्सम तोंडीलावणी तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
तिने हा उद्योग करण्याचे मनावर घेतले. एकीकडे नोकरी होतीच. नोकरीतून मिळणाऱया वेतनाचा काही भाग या नव्या उद्योगात गुंतवून तिने प्रथम मर्यादित स्वरूपात हा उद्योग सुरू केला. त्याचे नाव तिने ‘जयनी पिकल्स’ असे ठेवले. ऑन लाईन आणि ऑफ लाईन अशा दोन्ही माध्यमातून घरगुती, स्वतःच्या हाताने तयार केलेली विविध प्रकारची लोणची विकण्यास प्रारंभ केला. दोन वर्षांमध्ये या उद्योगाची उलाढाल आता वार्षिक 30 लाखांपर्यंत पोहचली आहे.
या उद्योगात त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या बहुतेक सदस्यांचे साहाय्य मिळते. त्या एकत्र कुटुंबातील असल्याने त्यांना या उद्योगासाठी स्वतंत्र कामगार ठेवावे लागत नाहीत. कुटुंबातील सदस्यच एकेका कामाची जबाबदारी स्वीकारतात. त्यामुळे खर्च वाचतो आणि व्यवसायातून ल्नाभ अधिक होतो. त्यांचे पदार्थ उत्तम चवीचे असल्याने मागणीही भरपूर आहे. आता आपल्या या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना असून मुरांबे व इतर तेंडीलावणीही त्यांना विकायची आहेत. अशा प्रकारे त्यांची ही यशोगाथा इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरलेली आहे.









