वार्ताहर/ लोटे
लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड कंपनीत सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास बॉयलरमध्ये स्फोट होऊन अचानक लागलेल्या आगीत तीन कामगार जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
अंकित वर्मा, अंकुश नारायण बडदे, रोहित यादव (तिघेही रा. लोटे) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट होऊन धुर येताच कर्मचाऱयांची धावाधाव सुरू झाली. क्षणार्धात अगीचा भडका उडाला. व्यवस्थापनाने तातडीने लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक बंबास माहिती दिली. अग्निशमन अधिकारी आनंद परब यांनी कर्मचाऱयांसह दोन अग्निशमक बंब घटनास्थळी तैनात करत अर्धा तासात आग आटोक्यात आणली.
दुर्घटनेत दोन कर्मचारी भाजले आहेत. एक कर्मचारी आतमध्येच अडकून पडल्याने बंद खिडकीच्या काचा फोडून त्यास बाहेर काढताना काच त्याच्या डोक्यात लागली. जखमी कामगारांना कंपनीच्या रूग्णवाहिकेने चिपळूण येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातील अंकित वर्मा यास डिस्चार्ज देण्यात आला आहे. अंकुश बडदे 5 टक्के, तर रोहित यादव 35 टक्के भाजला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व सहकाऱयांनी पंचनामा केला.









