बॉयलरचे तापमान वाढून केमिकल ड्रम पेटले,
वार्ताहर/ लोटे
लोटे औद्योगिक वसाहतीत स्फोटांची मालिका सुरूच असून एम.आर. फार्मा स्पेशालिटी प्रा. लि. कंपनीतील अग्नितांडवाने एमआयडीसी पुन्हा हादरली. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास बॉयलरचे तापमान वाढून लागलेल्या आगीत केमिकलचे ड्रम पेटल्याने धुराचे लोट पसरले. दुर्घटनेत जीवितहानी टळली असी तरी कंपनीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यातील हा सातवा स्फोट असून बळींची संख्या आता 10 वर गेली आहे.
बुधवारी सकाळी पहिल्या पाळीत कारखान्यात ड्रायर चार्जिंगचे काम सुरू होते. चार्जिंग सुरू असताना अचानक इलेक्ट्रीक स्पार्क झाल्याने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे वृत्त कळताच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमक दलाचे अधिकारी आनंद परब आपल्या कर्मचारी व बंबासह घटनास्थळी पोहचले. नगरपरिषदेचा अग्निशमक बंब व मदत ग्रुपचे सदस्यही घटनास्थळी दाखल झाले.
एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. कंपनीतील अधिकारी व कामगार प्रसंगावधान राखत तातडीने बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. आगीचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक निशा जाधव घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांची जादा कुमक तैनात केली. या घटनेमुळे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर उद्योगभवन येथे उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱयांसमवेत चर्चा झाली.
सततचे स्फोट, आग, वायुगळती याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. 1 मे रोजी उद्योगभवन येथे लोकप्रतिनिधी, उद्योजक व अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून याबाबत योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी दिले. दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीतील सातत्याने घडणारे स्फोट अन् आगीच्या घटनांनी पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.









