लोटे वसाहतीत तीन महिन्यात सहा स्फोट झाले, आठ बळी गेले. मात्र एकही राजकीय नेता या दुर्घटनेविरोधात तोंड उघडायला तयार होत नाही याचे सर्वसामान्यांना आश्चर्य वाटण्यासारखे आहे. मात्र अनेकांना माहीत आहे की, बरीचशी राजकीय मंडळी कारखानदारीवर पोसलेली आहेत.
कोकणात खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्समध्ये झालेल्या स्फोटात पाचजणांचा हकनाक बळी गेल्यानंतर गेल्या रविवारी याच औद्योगिक वसाहतीत समर्थ इंजिनिअरिंग कंपनीत झालेल्या स्फोटात तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला. याच वसाहतीत गेल्या तीन महिन्यात सहा कंपन्यात झालेल्या स्फोटात आतापर्यंत 8 जणांना प्राण गमवावे लागले. दुर्घटनेतून कोणीच धडा घेत नसल्याने हकनाक जीव मात्र जात आहेत. त्यामुळे या रासायनिक झोनमध्ये भोपाळसारखी पुनरावृत्ती घडण्याची राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा वाट पहात आहे का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
कोकणात रायगडनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांचा औद्योगिकदृष्टय़ा विचार केला तर मोठा रासायनिक झोन हा खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात आहे. लहान मोठे असंख्य कारखाने या वसाहतीत आहेत. डाऊ ऍग्रो, घरडा केमिकल्स, एक्सेल इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, यू. एस. व्हिटॅमिन, कंसाई नेरॉलक पेन्ट्स यासारख्या नामवंत कारखान्यांवर ही औद्योगिक वसाहत उभी आहे. या वसाहतीत प्रारंभीच्या काळात काही दुर्घटना घडल्या. त्यातून बरेच काही शिकल्यानंतर मध्यंतरीच्या पंधरा, वीस वर्षात फारशा दुर्घटना घडल्या नाहीत. आणि घडल्या असल्या तरी जीवितहानी प्रकर्षाने कमी झाली. मात्र आता पुन्हा एकदा मोठय़ा दुर्घटनांनी डोके वर काढले आहे.
लोटेतील कारखान्यांमध्ये स्फोटांची मालिका थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. गेल्या जानेवारी महिन्यापासून अवघ्या तीन महिन्यांत तब्बल सहा दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये आठ जणांचे होरपळून बळी गेले आहेत. ‘घरडा केमिकल्स’ या कारखान्यात पाच जणांचा बळी घेणाऱया स्फोटाला एक महिना पूर्ण होण्याच्या आतच रविवारी पुन्हा समर्थ इंजिनिअरिंगमध्ये मोठय़ा दुर्घटनेला या औद्योगिक क्षेत्राला सामोरे जावे लागले आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून वसाहतीतील दुर्गा केमिकल्स, पुष्कर पेट्रो केमिकल्स, सुप्रिया लाईफ सायन्सेस, घरडा केमिकल्स आणि रविवारी झालेल्या समर्थ इंजिनिअरिंग या कारखान्यात झालेले स्फोट आणि जीवितहानी लक्षात घेऊन त्यादृष्टीने उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.
या दुर्घटनांचा विचार केला तर येथे कारखाने उभारून आता सुमारे 40 वर्षे लोटली. त्यातील यंत्रसामग्री जुनी झाल्याने धोकादायक बनली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठीच लोटे क्षेत्रातील कारखान्यांमधील यंत्रसामग्रीचे तातडीने ऑडिट करण्यात यावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. यामध्ये केवळ ‘फायर ऑडिट’ नको, तर कालबाह्य यंत्रसामग्री आणि उत्पादन करण्यासाठी वापरण्यात येणारी जुनाट आणि दोषपूर्ण साधने यांचीही काटेकोरपणे तपासणी होणे आवश्यक आहे. कारण गेल्या अनेक वर्षांत अशाप्रकारे तपासणी झालेली नाही. तसे पाहिले तर उद्योगातील स्फोट, खाडी प्रदूषण, वायूगळती हे विशेषतः रासायनिक झोनमधील औद्योगिक वसाहतीमध्ये नित्याचेच आहे. दुर्घटना असो अथवा प्रदूषण असो, ते घडल्यानंतर नेहमीप्रमाणे हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱयांवर कारवाई करण्याची आणि घटनेची चौकशी करण्याची घोषणा केली जाते. मात्र अशा चौकशीतून पुढे काहीच निष्पन्न होताना दिसत नाही. मात्र भविष्याचा विचार करता विशेषतः रासायनिक औद्योगिक वसाहतीमधील दुर्घटनांवर सुरक्षेच्यादृष्टीने गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुळातच औद्योगिकीकरण होताना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा विचार 40 वर्षानंतर अजूनही केला गेलेला दिसत नाही. त्यामुळे आता त्याकडे स्थानिक प्रशासन, उद्योजक आणि लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज आहे. मुळातच कारखान्यांमध्ये होत असलेल्या असंख्य अपघातांमध्ये मानवी चूक व तांत्रिक दोष असल्याचे पुढे येत असले तरी बहुतांशी कंपन्यांचे व्यवस्थापन व मालक हे मानवी चुकांचे कारण पुढे करताना दिसतात. मुळातच कारखान्यांची सुरक्षाविषयक सर्व जबाबदारी असलेले औद्योगिक सुरक्षा विभाग निस्तेज बनल्याने दुर्घटना वाढत चालल्या आहेत.
मुळातच आता ज्या कारखान्यांमध्ये दुर्घटना घडल्या आहेत त्या कारखान्यांची औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱयांनी नियमित तपासणी केलेली आहे का, त्यांचा अहवाल काय सांगतो, त्यातून काय सुधारणा केली गेली होती का यांची चौकशी करून संबंधितांवर ठपका ठेवण्याची गरज आहे. विशेष म्हणजे लोटे वसाहतीत तीन महिन्यात सहा स्फोट झाले, आठ बळी गेले. मात्र एकही राजकीय नेता या दुर्घटनेविरोधात तोंड उघडायला तयार नाही याचे सर्वसामान्यांना आश्चर्य वाटण्यासारखे आहे. मात्र अनेकांना माहीत आहे की, बरीचशी राजकीय मंडळी कारखानदारीवर पोसलेली आहेत. या वसाहतीतून बराचसा निधी या मंडळींना मिळत असल्याने सारे बिनभोभट सुरू आहे. मात्र तरीही स्थानिक जनता आणि हजारो कामगारांच्या आरोग्याच्यादृष्टीने राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा यांनी या दुर्घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अन्यथा उद्या मोठी घटना घडल्यानंतर फार उशीर झालेला असेल.
राजेंद्र शिंदे








