पुलंचे अपूर्वाई पहिल्यांदा वाचले त्याला पाच दशके लोटली. त्यातले एक वर्णन अजूनही लक्षात आहे. लंडनमध्ये रस्त्यावर वर्तमानपत्रे विकायला ठेवलेली असतात. पण विपेता जागेवर नसतो. लोक हवे असलेले वर्तमानपत्र उचलतात, त्याची किंमत तिथल्या पेटीत टाकतात आणि जातात. कोणीही वर्तमानपत्र किंवा पेटीतले पैसे चोरत नाही. त्यावेळी हे फारच अद्भूत वाटले होते. कारण सार्वजनिक मोफत वाचनालयात ‘पेपर’ वाचायला जाणारी खूप माणसे पाहिलेली. अनेक ठिकाणी दुपारी चक्कर टाकली तर निम्मी वर्तमानपत्रे किंवा त्यातली पाने अदृश्य झालेली असतात. वाचनालयातले वर्तमानपत्र सर्वांसाठी असते. पण लक्षात कोण घेतो? फुकटे वाचक वाचनालय उघडण्याच्या वेळेला येऊन टपकतात आणि घाईघाईने वर्तमानपत्रात छापून आलेली शब्दकोडी सोडवून तिथेच उत्तरे लिहितात!
वाचनालयातल्या वर्तमानपत्रांची ही तऱहा तर पुस्तकांची वेगळी तऱहा. वाचनालयातून रहस्यकथा वाचायला नेणारे रसिक कथेतल्या खलनायकाचे किंवा खुन्याचे नाव पहिल्या पानावर लिहून ठेवतात. काही रसिक त्या पुस्तकावरचा अभिप्राय शेलक्मया शब्दात लिहून ठेवतात. उदाहरणार्थ, पुस्तक एकदम मस्त/फालतू आहे. नारायण धारप हे भयकथांसाठी प्रसिद्ध असलेले नाव. पण त्यांनी काही कौटुंबिक स्वरूपाच्या कादंबऱयाही लिहिल्या आहेत. दिलदार वाचक अशा पुस्तकांवर आधीच लिहून ठेवतात की, ‘या कादंबरीत भूत नाही. अजिबात वाचू नये.’ नारायण धारप यांच्या निधनाला अनेक वर्षे लोटली. नंतरच्या काळात राजकारणाचा पोत साफ बदलला. बिचाऱया धारपांना तरी लोकांनी या राजकारणात ओढायला नको होते. पण ओढले. धारपांची एक गाजलेली कादंबरी आहे, चंद्राची सावली. यात एक हाकामारी रात्री येऊन शापित बंगल्याभोवती घिरटय़ा घालते. बंगल्यात कोणी दिसला की त्याला लाडिक स्वरात नाव विचारते. त्याने नाव सांगितले की त्याचा मृत्यू अटळ असतो. अशी ही कादंबरी वाचताना एका राजकारण धुरंधर वाचकाने हाकामारीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून पुस्तकावर एका नेत्याचे नाव लिहिले. नंतर प्रतिपक्षातील वाचकाने दुसऱया नेत्याचे नाव लिहिले. रात्री उशिरा पायी फिरायला गेलं तर अनेक फेरीवाल्यांनी आपला माल हातगाडीवर जाड कागद किंवा ताडपत्री टाकून बांधून ठेवलेला दिसतो. कुलूप वगैरे नसते. पण त्यांच्या मालाची कधी चोरी झाल्याचे ऐकिवात नाही. म्हणजे आपली जनता प्रामाणिक देखील असते. पण मग गटारांवर असलेली बिडाची झाकणे, पुलांचे कठडे चोरीला जातात. आमच्या घराजवळच्या चौकात नेत्रदानाच्या आवाहनाचे शिल्प उभारले आहेत. त्यातल्या अंध व्यक्तीच्या पुतळय़ाच्या हातातली काठी चोरीला गेली आहे! काय बोलणार?