जे राजकारणी कालपर्यंत लोकांच्या जीवावर राजकारण करत होते ते आता लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. त्यामुळे सगळ्यालाच मी जबाबदार म्हणत आपणच आपली काळजी घेण्याची सध्या गरज आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, काल राज्यातील सर्वात उच्चांकी असा 503 लोकांचा मृत्यु झाला तर 68,631 रुग्णांची नोंद झाली. गेल्या आठवडाभरात रेमडेसिवीरवरून राजकारण चांगलेच रंगलेले पहायला मिळाले, एकीकडे भाजप आणि सत्ताधारी राजकारण करत असताना दुसरीकडे निष्पाप लोकांचा मात्र केवळ योग्य उपचार आणि वेळेवर सुविधा मिळत नसल्याचे मृत्यु होत आहे. कधी लसीकरणासाठी लसींचा साठाच संपत आला तर ऑक्सीजनअभावी धडाधड लोकांचे मृत्यु झाले तर रेमडेसिवीर इंजेक्शनच मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. लोकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ केला जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कुपीत पाणी भरून जर विक्री केली जात असेल आणि यात जर महाराष्ट्रात सत्ताधरी असलेल्या एका पक्षातील कार्यकर्त्याला अटक केली जात असेल तर काय बोलायचे? राज्यातील सत्ताधारी केंद्राकडे बोट दाखवतात तर केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील विरोधक असलेल्या भाजपवाले राज्य सरकार आपले अपयश लपविण्यासाठी केंद्रावर आरोप करत असल्याचे बोलायचे, मात्र आत्तापर्यंत दहावी-बारावी परीक्षा, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, शेतकऱयांना मदत, वीज बिल माफीची मागणी या विषयावरून टोकाचे राजकारण वेळोवेळी झाले, मग त्यात अजून भरीस भर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण असो किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप असो आणि त्या आरोपातून त्यांना राजीनामा देण्याची वेळ येवो, इथपर्यंत राजकारण ठीक होते मात्र एकीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना राज्यातील सगळ्या जिह्यात हे प्रमाण वाढत असताना सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करण्यात मश्गूल आहेत आणि तुमच्या राजकारणापायी लोकांचा नाहक बळी जात आहे.
महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकल्यास कारवाई केली जाईल, अशी धमकी पेंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गेले तीन दिवस चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे बघायला मिळत आहे. मलिक यांनी आरोप केल्यानंतर भाजपच्या गल्लीपासून दिल्लीतल्या नेत्यांनी हे आरोप सिद्ध करा नाही तर मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपली भूमिका जोरदारपणे मांडली, त्यातच रेमडेसिवीरच्या 60,000 इंजेक्शनचा साठा ब्रूक फार्मा कंपनीने लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित मालकाला चौकशीसाठी बोलावले. त्याची वकिली करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलिस ठाण्यात जावेत आणि त्यांनी तपास करणाऱया अधिकाऱयांना दमदाटी करावी, हे लाजिरवाणे आहे.
आता या कलगीतुऱयाचा दुसरा अंक संपून आता तिसरा अंक सुरू झाला असून केंद्र सरकारच्या विरोधात राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी अफवा पसरविली म्हणून भाजपने आता त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आज हजारो लोकांचे नाहक जीव जात आहेत केवळ राजकीय नेत्यांच्या शह कटशहच्या राजकारणामुळे, असे असेल तर मग सामान्य लोकांनी कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा, विशेष म्हणजे केवळ राजकारण आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी दोन्ही सरकारे आपल्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणांचा चांगलाच वापर करत आहेत, मात्र लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी यंत्रणांचा वापर केला जात नाही, उलट आरोग्य सुविधांच्या बाबतीत केंद महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप राज्यातील नेते केंद्रावर करत आहेत. आज राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय असणारा एकही नेता राज्यात नाही. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख या नेत्यांनी अनेक विषयांवर नेहमीच समन्वयक म्हणून आपली भूमिका बजावली होती. सध्या राज्यात शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत जे समन्वयाची भूमिका निभावताना दिसतात. आज राज्य एका मोठय़ा संकटातून जात आहे, अशा वेळी सरकार आणि सत्ताधारी यांच्यात समन्वय हवा, या समन्वयातूनच आता राज्य सावरले जाऊ शकते मात्र सत्ताधारी आणि विरोधक हे पंढरपूर असो किंवा बेळगाव असो केवळ राजकारण करण्यातच पुढे असल्याचे बघायला मिळाले. पंढरपूर पोटनिवडणूक लागली ती पण माजी आमदार भारत नाना भालके यांच्या निधनामुळे. पोट निवडणुकीत काही संकेत गेली अनेक वर्ष पाळले जात होते, काही नेते तर पोटनिवडणुकीला उमेदवार पण देत नसत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर शिवसेना भाजपची युती तुटलेली असतानाही शिवसेनेने प्रितम मुंडेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या राष्ट्रवादीत गेल्या आणि पोटनिवडणूक लढविली मात्र मनसेने तेथे उमेदवार दिला नाही, मात्र आता पोटनिवडणूकही प्रतिष्ठेची केली जात आहे. राज्यातील सर्व दिग्गज नेते या निवडणुकीत उतरले जे कधी विठोबाच्या दर्शनाला आत्तापर्यंत पंढरपूरला गेले नव्हते. त्यांना पण प्रचारासाठी पंढरपूर गाठावे लागले मात्र त्यांचे दुर्दैव असे की कोरोनामुळे विठ्ठल मंदीर बंद असल्याने विठ्ठलाचे दर्शन होऊ शकले नाही. शेवटी तुमचा हेतू प्रामाणिक असला पाहिजे अन्यथा मुख्यमंत्र्यांना सुद्धा शासकीय पूजेला जाता येत नाही हे गेल्या काही वर्षापूर्वी लोकांनी पाहिले. गोरगरीब जनतेसाठी सरकार हाच प्राणवायू आहे, मात्र आता सरकारच्या हातातूनच परिस्थिती सरकू लागल्याने पुढे काय होणार हे कोणालाच सांगता येत नाही. जे राजकारणी कालपर्यंत लोकांच्या जीवावर राजकारण होते ते आता लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. त्यामुळे सगळ्यालाच मी जबाबदार म्हणत आपणच आपली काळजी घेण्याची सध्या गरज आहे.
प्रवीण काळे








