भाजप प्रभारी रवी यांचा मंत्री, आमदारांना सल्ला : पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा घेतला आढावा
प्रतिनिधी /पणजी
पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने गोवा भेटीवर आलेले भाजप प्रभारी सी टी रवी यांनी शुक्रवारी दिवसभरात पक्षाचे आमदार, मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन आगामी काळात करावयाची कामे आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याच्या पार्श्वभूमीवर आता मतदारसंघात फिरा, लोकांची कामे करा, त्यांची मने जिंका असा सल्ला त्यांनी सर्वांना दिला.
गुरुवारी उशिरा गोव्यात दाखल झालेल्या रवी यांनी आमदार व मंत्री यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. त्यात सकाळच्या सत्रात त्यांनी आमदारांची भेट घेतली व दुपारी मंत्र्यांची बैठक घेतली. अलीकडेच भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या आठ आमदारांनीही रवी यांची भेट घेतली. त्यांची ही पहिलीच भेट होती. रवी यांनी त्यांना पक्षाची ध्येयधोरणे तसेच कार्यपद्धतीबद्दल मार्गदर्शन केले. पैकी काही आमदार त्यांना गुरूवारी रात्रीच ते उतरलेल्या हॉटेलात जाऊन भेटले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी वरिष्ठ पक्षपदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अन्य नेते यांना मार्गदर्शन केले.
राज्य सरकारच्या कामाचा आढावा
पक्षाच्या पणजी मुख्यालयात दिवसभर चाललेल्या या बैठकांमध्ये त्यांनी पक्षाच्या कामाचा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’सेवा पखवडा’ आणि ’बूथ सशक्तीकरण’ उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत पक्षाच्या पंधरा दिवसांच्या तसेच भाजप सरकार असलेल्या राज्यातील सरकारच्या कामांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सी. टी. रवी गोव्यात आले होते.
सर्व आमदार, मंत्र्यांशी चर्चा
या सर्व बैठकांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती. मंत्री मॉविन गुदिन्हो, विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, गोविंद गावडे, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई, नीलेश काब्राल, तसेच आमदारांपैकी रमेश तवडकर, दिगंबर कामत, उल्हास तुयेंकर, गणेश गावकर, जेनिफर मोन्सेरात, ज्योशुआ डिसोझा, डिलायला लोबो, मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडीस, प्रेमेंद्र शेट, देविया राणे, संकल्प आमोणकर, दाजी साळकर, आलेक्स सिक्वेरा, प्रविण आर्लेकर, आदींची उपस्थिती होती.
खासदार, पदाधिकाऱयांचीही भेट
त्याशिवाय खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, दयानंद सोपटे, जयेश साळगावकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आरती बांदोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान अनेक आमदारांनी स्वतःच्या मतदारसंघातील विविध समस्या रवी यांच्यासमोर मांडल्या. त्यात प्रामुख्याने वीज, पाणी, रस्ते आदी प्रश्न मांडले. बैठक संपल्यानंतर एकेक मंत्री, आमदार भाजप मुख्यालयातून खाली उतरत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले असता प्रत्येकाने बैठकीत झालेल्या चर्चेसंबंधी थोडक्यात माहिती दिली. रवी यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. तसेच मतदारसंघामध्ये फिरून लोकांची कामे करण्याचा सल्ला दिला असलेल्याचे त्यांनी सांगितले.