विधान परिषदेचे सभापती रामराजेंनी सर्वच सदस्यांना दिल्या सुचना
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या गटात व पंचायत समितीचे सभापती म्हणून आपल्या तालुक्यात व पदाधिकारी म्हणून जिह्यात काम करताना लोकांच्या हिताची कामे झाली पाहिजे याची भावना आपल्यात असली पाहिजे. पवारसाहेबांचा जो लोककल्याणाचा वारसा आपल्याला पुढे न्यायाचा आहे. लोकांची कामे केली पाहिजेत. कुठेही उणीवा निर्माण होता कामा नये, असा मुलमंत्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी दिला. दरम्यान, टेंबा मिरवणाऱया सदस्यांचे चांगलेच रामराजेंनी कान उपटले.
जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्य आणि पंचायत समितीच्या सभापती, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱयांची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, माजी शिक्षण सभापती राजेश पवार, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांकडून अडचणी समजून घेत, प्रत्येक गटात नेमक्या काय अडचणी आहेत ते जाणून घेतले. काही सदस्यांनी फंड मिळत नाहीत. जिल्हा परिषदेचे अधिकारी कामच करत नाहीत. दुर्लक्ष करतात. लोकांच्या हितासाठी आमचे एखादे काम घेवून गेलो की अधिकारी दुस्वास करतात. हिडीसफिडीस करतात, अशा तक्रार ऐकून घेतल्यानंतर रामराजेंनी त्यांना पवारसाहेबांचा जिल्हा आहे. या जिह्यात राष्ट्रवादीकडे नागरिक आस्थेने पाहातात. कामे लोकांची कामे झाली पाहिजेत. यासाठी लोकांची कामे झाली पाहिजेत अशा शब्दात त्यांनी उपदेश केला.
टेंबा मिरवणाऱया सदस्यांना चपराक
सतत पुढे पुढे करणारे काही सदस्य या बैठकीतही पुढे पुढे करत होते. ते नेमके रामराजे आणि बाळासहेब पाटील यांनी हेरले. त्यांचे चांगलेच कान उपटले. तरीही ते सदस्य सभापतींना बोलवले त्यावेळेसही तेच सदस्य पुढे पुढे करत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कुबले यांचे नेटके नियोजन
झेडपीच्या अध्यक्ष निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कुबले यांनी प्रत्येक गटात कसे लक्ष घालता येईल, यासाठी स्वतः लक्ष घालतो असे ग्वाही देत प्रत्येक राष्ट्रवादीच्या सदस्यांकडे प्राधान्य दिले जाते, असेही काही सदस्यांनी सुर आळवला होता. दरम्यान, काही सदस्यांनी मात्र, नव्याने आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या बाबतीत तक्रारी केल्या.








