मनोज पवार / दापोली
दापोली नगर पंचायत, दापोली निसर्ग सवंर्धन कार्यक्रमांतर्गत नारगोली धरण पुनरुजीवन मोहीम राबवण्यात आली. यावेळी धरणातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. या कामी तब्बल 600 नागरिकांचे हात लागले. 64 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर साकारलेल्या या उपक्रमातून दापोली शहराची तहान कायमची तर भागलीच. शिवाय जनतेने मनावर घेतले तर काहीच अशक्य नाही, यावर केंद्रानेही ’राष्ट्रीय जल पुरस्कार-2020 मध्ये देशात दुसरा पुरस्कार देऊन यावर शिक्कामोर्तब केले. हा दापोलीकरांच्या आयुष्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला अविस्मरणीय क्षण आहे.
हे नारगोली धरण 1978 साली बांधण्यात आले होते. या कोल्हापूर टाईप बंधायांची पाणी साठवण क्षमता 0.35 दशलक्ष घनमीटर होती. लांबी 185 मीटर व उंची 15.84 मीटर होती. या धरणाचे पाणलोट क्षेत्र 2.56 चौ. कि.मी. होते. 41 वर्षापूर्वी तेव्हाची लोकसंख्या गृहित धरून हे धरण बांधले होते. मात्र शहरीकरणाच्या वेगापुढे हे पाणी दिवसेंदिवस कमी पडत होते. साडेतीन ते चार हजार मिमी पाऊस पडणाऱया दापोली शहरावर दर उन्हाळ्य़ात टँकरने पाणी वाटप करण्याची नामुष्की नगर पंचायतीवर येत असे. यावर तोडगा म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन लोकसहभागातून या धरणातील गाळ काढून याची खोली वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याला दापोलीकारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
कामासाठी वापरले तब्बल 223 डंपर
या कामासाठी तब्बल 223 डंपर वापरण्यात आले. या डंपरव्दारे चक्क 78 हजार 660 क्युबिक मीटर गाळ व माती धरणातून काढण्यात आली. यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात 0.078 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढ झाली. धरणाचा पाणीसाठा पूर्वी 0.35 दशलक्ष घनमीटर होता. तो आता एकूण 0.43 एमसीएम. (दशलक्ष घनमीटर) झाला आहे. यामुळे वाढलेल्या पाण्यामुळेच दापोली नगर पंचायत एप्रिल व मेमध्ये पाणीटंचाई काळातही दापोली शहराला नियमितपणे पाणी पुरवठा करीत आहे. या मिशन नारगोली मोहिमेत शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला बचत गट व सामाजिक संस्था, पोलीस, पत्रकार आदींनी श्रमदानात भाग घेतला.
नगर पंचायतीकडून 36.63 लक्ष खर्च
धरणामध्ये खोलीकरण, रुंदीकरण, दगडी बंधारे, मातीची संरक्षक भिंत उभारणे, जमीन तयार करणे, ओढय़ाचे रुंदीकरण, श्रमदान इत्यादीचे अंदाजित मूल्य हे 269.67 लक्ष होत होते. धरणाच्या कामासाठी नगर पंचायतीने डंपर, इंधन व इतरसाठी एकूण 36.63 लक्ष खर्च नगर पंचायतीने केला. लोकसहभागामुळे शासनाच्या मोठय़ा रकमेची बचत झाली.
शासनाच्या 3 कोटी निधीची बचत
शासनाचे अलोरे येथील जलसंपदा विभागाने फक्त गाळ काढण्यासाठी 1,83,09, 308 रूपये इतके अंदाजपत्रक केले होते. नगर पंचायतीने लोकसहभागातून फक्त गाळ काढला नाही तर खोली करणे, रुंदीकरण, बंधारे व जमीन तयार केली आहे. त्यामुळे शासनाचे 3 कोटी इतक्या निधीची बचतही झाली.
धरण कामाला अनेकांची आर्थिक मदत
नागरिक व दापोलीकरांनी वाहन, इंधन, वस्तू व इतर सेवा स्वरुपात 53.52 लाख मदत केली. तर प्रत्यक्ष आर्थिक स्वरुपात 3.37 लाख जमा केले गेले. यासाठी बँकेत वेगळे खातेही सुरू करण्यात आले होते. धरणाच्या कामाला व धरणाला अनेक मान्यवरांनी मदत केली.









