माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांचा दावा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला पाठिंबा
प्रतिनिधी/ मडगाव
माजी मंत्री आणि बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा घोषित केलेला असून गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपचाच विजय होईल, असा दावा त्यांनी शनिवारी वार्का येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गोव्यातील भाजपाचे सरकार पुढील किमान पंधरा वर्षे तरी कायम राहील, असेही ते म्हणाले.
यावेळी आलेमाव यांना ते भाजपात जाणार आहेत का असे विचारले असता त्यांनी वेळ आल्यानंतर आपण कुठे जाणार ते कळेल, असे उत्तर दिले. आपला पाठिंबा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना असून लोकसभा निवडणुकीत आपला त्यांना पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप देशात सत्तेवर आल्यानंतर बॉम्बस्फोटसारख्या घटना घडलेल्या नसून देशात शांती नांदत आहे, असे मत आलेमाव यांनी व्यक्त केले
आपले गोव्यातील कुठल्याही मतदारसंघात किमान 3000 मतदार असून आपण नेहमी आश्वासने पाळलेली आहेत आणि कामे केलेली आहेत. आपण मुख्यमंत्रीपदावर आरुढ झाल्यानंतर आश्वासन दिल्याप्रमाणे 19 दिवसानंतर पायउतार झालो आणि या 19 दिवसांत मडगाव कोकण रेल्वे स्थानक तसेच मडगावातील रेल्वे उ•ाणपूल आणि तिळारी प्रकल्प आदी चार महत्त्पवूर्ण प्रकल्पांची पायाभरणी केली, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.
आपणही दोन वेळा खासदार राहिलो होतो आणि त्यावेळी विकासकामांसाठी वर्षासाठी खासदार निधीपोटी एक कोटी ऊपये मिळायचे. त्यातून आपण केलेली कामे लोकांना माहीत आहेत. आता वर्षाकाठी पाच कोटी ऊपये याप्रमाणे प्रत्येक कार्यकाळासाठी 25 कोटी मिळतात. मात्र त्यातून दक्षिण गोव्याच्या खासदारांनी नेमके काय केले आहे ते कुठेही दिसत नाही, अशी टीका आलेमाव यांनी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यावर केली. तृणमूल काँग्रेसचा आपण राजीनामा दिलेला नाही. मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आपण त्यांच्या कार्यालयातही गेलेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आलेमाव यांनी खारेबांद येथे डॉ. जॅक सिकेरा यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले असे पत्रकारांनी विचारले असता, आपण पराभूत झालेलो असल्याने आता आपल्याला ते शक्य नाही, असे त्यांनी सांगितले









