ऑनलाईन टीम / पुणे :
लोकसाहित्य हे अस्सल साहित्य आहे. पूर्वी पहाटेपासून दिवसभर काम करून थकलेले लोक सूर्यास्तानंतर मनोरंजनासाठी नृत्य, गायन आणि वाद्यवादन करीत असत. या कलाविष्कारातून लोकसाहित्य निर्माण झाले. लोकसंस्कृती हा साहित्याचा गाभा आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठनतर्फे आयोजित 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात आज यशंवतराव चव्हाण नाट्यगृहात ‘वाग्यज्ञ साहित्य व कला गाैरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखिका डाॅ. अरुणा ढेऱे आणि अभिनेते मोहन जोशी यांना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रोख रुपये 11 हजार आणि सन्मान चिन्ह असे स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणा-या या पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले की, साहित्य-कला आणि तंत्रज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साहित्य- कला यातून कसं जगायचं हे शिकायला मिळतं, तर तंत्रज्ञान आनंद देण्याचे काम करते. जाणीव आणि नेणीव यांना एकत्र बांधण्याचे काम साहित्य करते. साहित्य-कला म्हणजे माणसाचा प्राणवायू आहे. केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा याच माणसाच्या मुलभूत गरजा नाहीत. तर साहित्य आणि कला यांनाही मानवी जीवनात तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. साहित्य सर्व माणसांना एका पातळीवर आणण्याचे काम करते. व्यवसायाने वेगवेगळे असलेले लोक साहित्याच्या समान धाग्याने एकाच पातळीवर येतात.
अभिनेते मोहन जोशी म्हणाले की, माझे पूर्वाश्रमीचे आयुष्य खूपच कष्टप्रद आणि वेगळ्या धाटणीचे होते. मुंबई या शहराविषयी माझे काही दुषित पूर्वग्रह होते. मात्र, मला उत्तम दिग्दर्शक आणि चांगल्या कलाकारांचा चमु मिळाल्याने मी अभिनय क्षेत्रात पुढे येऊ शकलो. मानसिंग पवार यांनी असे पाहुणे येती ही मालिका मला दिली आणि त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. नाटकाचे दौरे आणि मालिका तसेच चित्रपटांच्या निमित्ताने मी संपूर्ण भारतभ्रमण केले. त्यामुळे मी अधिक अनुभवसंपन्न झालो.









