हलगा-मच्छे बायपास रस्त्याला विरोध
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास हा रस्ता तिबार पिकी जमिनीतून केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे अल्पभूधारक असलेल्या शेतकऱयांच्या जमिनी या रस्त्यामध्ये जात आहेत. शेतकऱयांनी विरोध केला असला तरी देखील दडपशाही करत रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी दररोज रस्त्याच्या बाजूला बसून लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत.
शेतकरी व त्यांचे कुटुंबीय हतबल होवून केवळ आंदोलन करताना दिसत आहेत. पोलीस फौजफाटय़ासमोर या शेतकऱयांचे काहीच चालले नाही. त्यामुळे त्याठिकाणी बसून आपला निषेध नोंदवत आहेत.
अवघ्या चारच दिवसांत या रस्त्याचे कामकाज अधिक तीव्र गतीने करण्यात आले. शेतकऱयांचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना न्यायालयाचा अवमान करत या रस्त्याचे कामकाज सुरू आहे.
हलगा-मच्छे बायपास हा रस्ता करत असताना शेतकऱयांना विश्वासात घेतले नाही. काही शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मात्र त्यांची जमीन त्या रस्त्यामध्ये गेली नाही. त्यामुळे या रस्त्याला तीव्र विरोध होत आहे. सोमवारी येळ्ळूर रस्त्याजवळ बसून आंदोलन करण्यात आले. यामध्ये राजू मरवे, भोमेश बिर्जे, मारुती बिर्जे, भैरु कंग्राळकर, मनोहर कंग्राळकर नितीन पैलवानाचे, भय्या होसूरकर, सुरेश मऱयाकाचे, राजेंद्र देसाई, हणमंत कंग्राळकर, ओमकार कंग्राळकर, आदित्य कंग्राळकर, विनायक हलगेकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.









