राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे गौरवोद्गार, : महिला सन्मान योजनेचा राजेशाही प्रारंभ
प्रतिनिधी /सातारा
लोकमान्य सोसायटी ही केवळ अर्थकारण पाहणारी संस्था नसून सक्षम समाज निर्माण करणारी चळवळ आहे. किरण ठाकुर यांना लोकमान्यता आहेच, शिवाय त्यांच्या कार्याला राजमान्यताही लाभली आहे, असे गौरवोद्गार राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी काढले.
राजधानी साताऱयातील जलमंदिर पॅलेसमधील दरबार हॉलमध्ये लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्याच्या ‘महिला सन्मान योजने’चा राजमाता कल्पनाराजे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, कॉम्रेड किरण माने, शाखाधिकारी सुनील मोरे, मदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
योजनेचा शुभारंभ करताना राजमाता कल्पनाराजे म्हणाल्या की, सहकार क्षेत्रातील अग्रगण्य लोकमान्य सोसायटी नेहमीच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. ही योजना महिलांच्या बचतीने नवे धोरण आखणार आहे. यामुळे महिला आर्थिकदृष्टया आणखी सक्षम होणार आहेत. या योजनेत महिलांनी जास्तीत गुंतवणूक करून फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना लोकमान्यांनी ज्या टिळकवाडी-बेळगावमध्ये केली त्याच भूमीत या संस्थेचा जन्म झाला हा तमाम हिंदुस्थानसाठी अभिमानाचा विषय आहे. केवळ अर्थकारण न करता राष्ट्रकारण करणे हा किरण ठाकुर यांचा यातून उद्देश दिसून येतो. आज ही सोसायटी देशातली प्रथम क्रमांकाची बनली असली तरी त्या मागील त्यांचा त्याग विसरून चालणार नाही.
राष्ट्र सक्षम बनवायचे असेल तर महिला सक्षम बनायला हव्यात. जागतिक महिला दिन हा भारताने साऱया जगाला दिलेला आविष्कार आहे. लोकमान्य सोसायटीने ‘महिला सन्मान ठेव योजना’ आखताना केलेला विचार सर्वोत्तम आहे, असेही राजमाता कल्पनाराजे म्हणाल्या
राजमाता कल्पनाराजे पुढे म्हणाल्या की, महिला सन्मान योजनेचा प्रारंभ राजधानी साताऱयात होताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. ज्या साताऱयात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली, ज्या साताऱयात महिलांना लष्करी प्रशिक्षण देण्याचा देशातील प्रारंभ झाला, त्याच भूमीत ही योजना साकारत आहे. जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, स्वतःची उन्नती करताना आपला संसार नेटका करत राष्ट्रहित जोपासावे, हीच छत्रपती उदयनराजे आणि आमच्या वतीने आपणाला शुभेच्छा. किरण ठाकुर यांनी आपल्या अलौकिक कार्यातून लोकमान्यता मिळवली आहे हे आम्ही वेगळे सांगायला नको. मात्र त्यांनी राजमान्यताही मिळवली आहे, हे सांगताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, असेही त्यांनी गौरवोद्गार या प्रसंगी काढले.
यावेळी किरण माने म्हणाले, सीमाप्रश्नांचा लढा अद्यापही ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी ज्वलंत ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक प्रभावळकर म्हणाले, लोकशिक्षण, स्वातंत्र्यलढा यासाठी तयार झालेली ही संस्था आहे. आणि अभिमान वाटतो की ‘तरुण भारत’ला यावर्षी 102 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ऐतिहासिक सातारा जिह्याने ‘तरुण भारत’ला जे उदंड प्रेम दिले तेच प्रेम ‘लोकमान्य’ला सातारा जिह्याने दिले आहे. आज राजधानी साताऱयातील जलमंदिर पॅलेसमध्ये लोकमान्यला जो सन्मान मिळाला, यावरूनच अखंड स्वराज्यात त्यांना राजमान्यता मिळाली असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटत आहे. सूत्रसंचालन वरिष्ठ शाखाधिकारी सुनील मोरे यांनी केले.









