प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त (पूर्वसंध्येला) ‘नक्षत्रांचे देणे’ या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला. यानिमित्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृती सांगणारे छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. धारवाड येथील सोमनाथ जी. जोशी यांनी पं. भीमसेन जोशी यांची संग्रहित केलेली दुर्मीळ छायाचित्रे, पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित नक्षत्रांचे देणे या विशेष कार्यक्रमांतर्गत पं. भीमसेन जोशी यांची 1957 पासून 1975, 77, अशा जुन्या काळातील चित्रफीतींचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. मध्यंतरात धारवाड येथील एस. जी. जोशी यांचा प्रा. अनिल चौधरी आणि अशोक गरगट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, पं. भीमसेन जोशी यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे तसेच त्यांच्यावरील पुस्तकांचे प्रदर्शन सायंकाळी 4 ते रात्री 9 यावेळेत रसिकांना पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी मांडण्यात आले होते.
एस. जी. जोशी यांच्या धारवाड येथील निवासस्थानी पं. भीमसेन जोशी यांच्यावरील संग्रहित छायाचित्रे, दुर्मीळ व्हिडिओ तसेच मराठी, इंग्रजी व कन्नड भाषेतील पुस्तकांचा संग्रह याबरोबरच पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाचा ऑडिओ, व्हिडिओ, कॅसेट, सीडी, डीव्हीडी लाँगप्ले आदींचा संग्रहही उपलब्ध असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले.









