प्रतिनिधी / फोंडा
लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वरचा बाजार फोंडा शाखेच्या व्यवस्थापिका सौ. जान्हवी संदेश पाटकर (45) यांचे काल बुधवारी सकाळी निधन झाले. कोरानाची बाधा झाल्याने गेल्या दहा दिवसांपासून मडगाव येथील ग्रेस इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र कोरोनाशी चाललेली त्यांची झुंज अयशस्वी ठरली. त्यांच्या अकाली निधनाबद्दल लोकमान्य परिवाराला जबर धक्का बसला आहे.
मूळ बेळगाव येथील जान्हवी पाटकर या सध्या शांतीनगर-फोंडा येथील राजांगण सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. लोकामान्य सोसाटीच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 1999 पासून त्या लोकमान्यच्या सेवेत होत्या. सुरुवातीचा काही काळ बेळगाव येथे कार्यरत असलेल्या पाटकर सन 2003 पासून गोव्यात आल्या. सुरुवातीला साखळी शाखेत व त्यानंतर तिस्क उसगाव, सदर-फोंडा, बांदोडा या लोकमान्यच्या विविध शाखांमध्ये त्यांनी व्यवस्थापिका म्हणून सेवा दिली. सध्या वरचा बाजार फोंडा येथील शाखेत त्या कार्यरत होत्या. अत्यंत मृदू व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जाडेली होती. त्यांच्यापश्चात सासू, पती संदेश पाटकर, पुत्र वरद व वेद असा परिवार आहे. बुधवारी दुपारी फोंडा स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंद नाईक व इतर हितचिंतक उपस्थित होते.
लोकमान्य परिवारातर्फे श्रद्धांजली
लोकमान्य परिवारातर्फे म्हापसा येथील विभागीय कार्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, प्रितम बिजलानी, उत्तर गोव्याचे विभागीय व्यवस्थापक कुमार प्रियोळकर, उपव्यवस्थापक ऍन्थोनी आझावेदो तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकमान्य सोसाटीने एक प्रामाणिक व कार्यतत्पर व्यवस्थापिका गमावल्याची भावना लोकमान्य परिवारातर्फे यावेळी व्यक्त करण्यात आली.









