पुलाची शिरोली / वार्ताहर
लोक भावनेचा विचार करून नागाव आणि पुलाची शिरोली ही गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या लोकांनी हट्ट सोडावा तसेच लोकप्रतिनिधी या नात्याने माझा विरोधच राहील असे स्पष्ट मत हातकणंगलेचे काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महापालिकेच्या हद्दवाढीचा विषय पुन्हा चिघळला आहे. स्थानिक आमदार या नात्याने या दोन गावातील लोकभावनेचा आदर करणे आवश्यक आहे. नागाव आणि पुलाची शिरोली या गावाची कोल्हापूर शहराशी कोणत्याही प्रकारची भौगोलिक संलग्नता नाही. केवळ महसूलाची रक्कम डोळ्यासमोर ठेवून हा हद्दवाढीचा घाट घातला जात आहे असे आमदार आवळे यांनी सांगितले. तीन वर्षापूर्वी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. पण प्राधिकरणाच्या निर्मीतीमुळे ग्रामस्थांच्या समस्येत भर पडली. यामुळे सर्व सामान्य लोक हेलपाटे मारुन मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे प्राधिकरण रद्द करून शिरोलीसाठी स्वतंत्र नगरपालिका करावी शिरोलीकरांच्या या मागणीसाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आवळे यांनी सांगितले.