सांगरुळ / प्रतिनिधी
बोलोली (ता. करवीर ) येथील लोकनियुक्त सरपंच सदाशिव बापू बाटे यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव नामंजूर झाला आहे. ग्रामपंचायत एकूण सदस्य संख्या बारा असून एकूण सदस्य संख्येच्या किमान तीन चतुर्थांश सदस्य म्हणजेच ९ सदस्य ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक होते. पण सरपंच आणि तीन सदस्य अनुपस्थित राहिल्याने तहसीलदार शीतल मुळे भामरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला.
बोलोली ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंचासह एकूण १२ सदस्य संख्या आहे. यातील उपसरपंच सतीश बाटे, जगन्नाथ बाटे, अमर सुतार, सुनील कांबळे, छाया सुतार, सरसाबई कारंडे, आऊबाई शिपेकर, सुनंदा दुर्गुळे या आठ सदस्यांनी लोकनियुक्त सरपंच सदाशिव बाटे यांच्यावर स्थायिकचे राहण्यासाठी नसल्याने विकास कामांमध्ये व्यत्यय येत असल्याचे कारण देत 12 नोव्हेंबरला अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. या ठरावावरती निर्णय घेण्यासाठी तहसीलदार शीतल मुळे भामरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी एकूण सदस्य संख्येच्या किमान 9 सदस्यांनी विरोधात मतदान करणे गरजेचे होते. पण प्रत्येक्षात आठच सदस्य सभेसाठी हजर राहिले होते, तर सरपंचासह तीन सदस्य अनुपस्थित राहिल्याने अविश्वास ठराव बारगळल्याचे तहसीलदार शीतल मुळे भामरे यांनी सांगितले.
या विशेष सभेला सर्कल सुहास गोदे, ग्रामसेवक एम जी पाटील, प्रवीण भोसले, तलाठी काटकर, पोलीस पाटील गजानन शिंदे, सचिन पोवार आदी उपस्थित होते.








