चिराग पास्वान यांना धक्का, पारस नवे अध्यक्ष
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिवंगत नेते राम विलास पास्वान यांनी स्थापन केलेल्या लोकजनशक्ती पक्षात बंडखोरी झाली आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा आणि रामविलास पास्वान यांचे पुत्र चिराग यांचे पक्षावरचे नियंत्रण धोक्यात आले आहे. या पक्षाच्या सहा पैकी पाच खासदारांनी पशुपतीकुमार पारस यांची निवड पक्षाचे लोकसभेतील नेते म्हणून सोमवारी निवड केली. आपल्या गटाला वेगळा गट म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी पारस यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे.
चिराग पास्वान हे पशुपती कुमार पारस यांचे भाचे आहेत. पक्षात फूट पाडल्याचा इन्कार पारस यांनी केला. पक्षाचे 6 लोकसभा खासदार आहेत. त्यांनी चिराग पास्वान यांची पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होर्तीं. तथापि, आपण त्यांची समजूत घातली. या 5 खासदारांची लोकसभेतील नेता बदलण्याची मागणी स्वीकारून आपण पक्षाचा बचावच केला आहे, असे प्रतिपादन पारस यांनी केले. राम विलास पास्वान यांचे निधन एक वर्षापूर्वी झाले होते. त्यानंतर चिराग यांना पक्ष चालविण्यात सातत्याने अडचणी आल्या आहेत.
लोजपचे ज्येष्ठ नेते केशव सिंग यांनी काही महिन्यांपूर्वी संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे. तेव्हापासून त्यांनी चिराग यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. चिराग यांच्या कार्यपद्धतीमुळे एक दिवस पक्ष कोडमडल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी वारंवार बोलून दाखविले होते. पाच खासदारांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या म्हणण्याचे प्रत्यंतर येत आहे, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.
भ्रष्टाचाराचे आरोप
चिराग पास्वान यांच्यावर केशव सिंग यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. चिराग हे आठ कंपन्यांचे मालक आहेत. या कंपन्यांच्या मालमत्ता देशभरात आहेत. एवढा पैसा त्यांच्याकडे कोठून आला, याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांचे चिराग यांच्याशी पटत नव्हते, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. मतभेद मिटवून फूट टाळण्याचे प्रयत्न पेले जात असले तरी सोमवारच्या निर्णायक घटनेनंतर ते वाया गेल्याचे उघड होत आहे.









