प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशनच्यावतीने दत्तक खेडेगाव बेटणे येथे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. लोककल्प फौंडेशनचे संचालक किरण गावडे यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात डॉ. तेजस्वी तीर्थहळ्ळी व डॉ. श्रीनिवास मूर्ती यांच्या सहकार्याने हे मोफत नेत्र तपासणी शिबिर लोककल्प फौंडेशनने आयोजित केले होते. त्यातील गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले. या प्रकल्पासाठी अनेक दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले असून, लोक कल्प फौंडेशनच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. लोकमान्य सोसायटीने 32 गावे दत्तक घेतली असून, बेटणे गावचा त्यात समावेश आहे. अतिशय दुर्गम भागात घनदाट जंगलात हे गाव वसले असून जीवनावश्यक गोष्टीपासुन वंचित आहे. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्गम भागात विविध लोकोपयोगी कामांची सुरूवात झाली आहे. कणकुंबी भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवेबरोबरच उपजीविकेसाठी विविध छोटया व्यवसायाची सोय करण्यात लोकमान्य सोसायटीने पुढाकार घेतला आहे. कणकुंबी येथे लोक कल्प फौंडेशनच्या द्वारे विविध वस्तुच्या विक्रीसाठी दालन उपलब्ध केले आहे.









