ब्रिटिशांच्या काळात करण्यात आला रेल्वेमार्ग
प्रतिनिधी/ बेळगाव
लोंढा ते बेळगाव या दरम्यानचा रेल्वेमार्ग 21 मार्च 1887 मध्ये लोकार्पण करण्यात आला होता. रविवारी याला 134 वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिश काळात झालेल्या या रेल्वेमार्गाचे लोकार्पण हे आठवण्याजोगेच आहे. त्या काळी प्रवासी वाहतुकीसोबत मालवाहतूक करण्यात यावी, यासाठी हा मार्ग बनविण्यात आला होता. खानापूरच्या घनदाट जंगलातून हा मार्ग तयार करण्याचे शिवधनुष्य त्याकाळी अभियंत्यांनी पेलले होते. आता 134 वर्षांनंतर हा मार्ग दुपदरी व विद्युतीकरणासह लवकरच नव्या स्वरुपात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
ब्रिटिशांनी क्यापाराच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरू केली. बेळगाव हे शहर भौगोलिकदृष्टय़ा आसपासच्या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे त्या काळी मोठे रेल्वेस्थानक उभे राहिले. मुंबई ते ठाणे या मार्गावर 1853 मध्ये पहिली रेल्वे धावल्यानंतर देशाच्या इतर भागात रेल्वेमार्ग करण्यास सुरुवात झाली. लोंढा ते बेळगाव अंदाजे 50 कि.मी.चा मार्ग तयार झाल्यानंतर 21 मार्च 1887 मध्ये मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर 10 महिन्यांच्या कालावधीनंतर डिसेंबर 1887 मध्ये बेळगाव ते मिरज (138.21 कि. मी.) या रेल्वेमार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्या काळी ‘साऊदर्न मराठा रेल्वे’द्वारे वाहतूक करण्यात येत होती.
सांगली रेल्वे विभाग म्हणून ओळख
त्या काळी सांगली येथे संस्थान असल्याने सांगलीचे महत्त्व अधिक होते. सांगली संस्थान असल्याने या संपूर्ण रेल्वे मार्गाला ‘सांगली रेल्वे विभाग’ म्हणून ओळखला जात होता. या विभागात मुख्य रेल्वेस्थानक हे बेळगावला होते. या विभागात विजयनगर, उगार खुर्द, चिंचली, रायबाग, चिकोडी रोड, बागेवाडी, घटप्रभा, परकनहट्टी, पाच्छापूर, सुळेभावी या रेल्वेस्थानकांचा समावेश होता. एकूण 90 मैल इतकी या रेल्वेमार्गाची लांबी होती.
आता दुपदरीकरणाने मिळणार नवी ओळख
लोंढा ते मिरज या 186 कि. मी. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. यातील काही भाग पूर्ण झाला असून पुढील काही वर्षांमध्ये या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. दुपदरीकरणासोबत विद्युतीकरण करण्यात येत असून यामुळे रेल्वेचा वेग वाढणार आहे. इंधनाची बचत होऊन कमी वेळेत रेल्वेचा प्रवास करता येणार आहे. मागील 134 वर्षांत या रेल्वेमार्गात अनेक बदल झाले असून रेल्वेच्या गतीमध्ये वाढ झाली आहे.