खानापूर / वार्ताहर
गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या धुवाधार पावसाने खानापूर तालुक्मयातील जनजीवन विस्कळीत केले. शुक्रवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने शनिवारी दिवसभर जनजीवन सुरळीत झाले. पण या पावसामुळे खानापूर-रामनगर -अनमोडमार्गे गोव्याला जाणारा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. लोंढा-रामनगर दरम्यान असलेल्या पांढरी नदीवरील पूल ढासळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे खानापूर-रामनगरमार्गे गोव्याला जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. खानापूर-हेम्माडगामार्गे अनमोडला जाणारा पर्यायी रस्ता हालात्री नदीवर पाणी आल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत पूर्णतः बंद होता. त्यामुळे खानापूरमार्गे गोव्याला जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
बेळगाव-लोंढा-रामनगर-अनमोडमार्गे गोव्याला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खानापूर ते रामनगरदरम्यान गेल्या दोन वर्षात विकासाअभावी ठप्प झाला आहे. पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण होणार अशी अपेक्षा असतानाच या रस्त्याचे काम रखडले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या चर्चेत राहिला. सद्य परिस्थितीत ओबड-धोबड रस्त्यातून वाहतूक सुरू होती. परंतु लोंढय़ाजवळील पांढरी नदीवर असलेल्या महामार्गावरील पूल पूर्णतः खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणी पांढरी नदीवर महामार्गच्या विकासासाठी नदीत चार पिलर उभारण्यात आले आहेत. परंतु काम बंद राहिल्याने गेल्या दोन वर्षांपासून काम जैसे थे राहिले आहे. या नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बाजूने जुन्या मार्गाचा काही भाग शिल्लक ठेऊन त्यावरून वाहतूक सुरू होती. परंतु या पुलाजवळ पांढरी नदीतील पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने महामार्गावरील सदर पुलाची बाजू पूर्णतः ढासळली आहे. त्यामुळे लोंढा ते रामनगर दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
आता हा राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यासाठी पर्यायी रस्ताही करणे अवघड आहे. कारण सदर पांढरी नदीवरील पूल हा किमान 30 फूट उंचीचा आहे. त्यामुळे तातडीने बनविणे अवघड आहे. या महामार्गाच्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेला पूलही अर्धवट आहे. त्यावर स्लॅब टाकण्यात आले नाही. त्यामुळे आता हा रस्ता कसा सुरू होणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
खानापूर ते रामनगर दरम्यान रस्ता दुरुस्तीसाठी वनखाते व पर्यावरण विभागाने गेल्या एक जुलै रोजी परवाना दिला असला तरी पावसाळा सुरू असल्याने रस्ता दुरुस्तीचे काम होणे अवघड आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. सध्या धुवाधार पावसाने रस्त्यावरील दलदल कमी झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा नसला तरी आता पांढरी नदीवरील पूल ढासळल्याने हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे.
खानापूरहून हेम्माडगामार्गे अनमोडला जोडणारा राज्यमार्गदेखील बंद आहे. या राज्य मार्गावरील हालात्री पुलावर पाणी असल्याने गोव्याला जाणारी दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे हा रस्ता कधी खुला होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोव्याला अनमोडमार्गे जाण्यासाठी आता केवळ नागरगाळी मार्गे रस्ता कार्यरत असून प्रवाशांना आता लांबच्या प्रवासामुळे भुर्दंड सोसावा लागणार आहे.









