अवघ्या 24 धावात 6 बळी : दुसऱया वनडेत इंग्लंडचा 100 धावांनी एकतर्फी विजय, 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी, रविवारी ‘व्हर्च्युअल फायनल़’

वृत्तसंस्था /लंडन
रीस टॉपलीने अवघ्या 24 धावात 6 बळी घेत भारतीय फलंदाजीला जोरदार सुरुंग लावल्यानंतर इंग्लंडने येथील दुसऱया वनडेत भारताचा 100 धावांनी धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मालिकेतील तिसरी व शेवटची लढत रविवार दि. 17 रोजी खेळवली जाईल.
या लढतीत प्रारंभी, फिरकीपटू यजुवेंद्र चहलचे 4 बळी आणि बुमराह-पंडय़ाच्या प्रत्येकी 2 बळीच्या जोरावर भारताने यजमान इंग्लंडचा डाव 49 षटकात 246 धावांवर गुंडाळला. पण, प्रत्युत्तरात भारताचा डाव 38.5 षटकात 146 धावांमध्येच उखडला गेला.

विजयासाठी 247 धावांचे आव्हान असताना रोहित शर्मा (0), धवन (9), विराट कोहली (16), रिषभ पंत (0) स्वस्तात गारद झाले आणि त्यानंतर भारताचे आव्हान खालसा होण्यास फारसा वेळ लागला नाही. हार्दिक पंडय़ा (29), रविंद्र जडेजा (29), सूर्यकुमार यादव (27), शमी (23) यांनी फटकेबाजी केली असली तरी त्यांच्या प्रयत्नांवर खूपच मर्यादा राहिल्या.
रीस टॉपलीने रोहित, धवन, सूर्यकुमार, शमी, चहल व प्रसिद्ध कृष्णा असे 6 फलंदाज गारद केले. विली, कार्स, मोईन अली, लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ,
तत्पूर्वी, इंग्लंडचा डाव 246 धावात गुंडाळताना चहलने 10 षटकांचा कोटा पूर्ण करत 47 धावात 4 बळी घेतले. त्याला बुमराह (2-49), पंडय़ा (2-28) यांची उत्तम साथ लाभली.
भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडला प्रथम फलंदाजीला धाडले आणि प्रारंभी हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडणारा ठरला. इंग्लिश सलामीवीर जेसॉन रॉयला (33 चेंडूत 23) या सामन्यातही अपेक्षित सूर सापडला नाही. त्याने पंडय़ाच्या हाफ व्हॉलीवर फ्लिकचा प्रयत्न केला. पण, हातातून बॅट फिरल्याने अंदाज चुकला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरील यादवने सोपा झेल टिपला. जॉनी बेअरस्टोने 38 चेंडूत 38 धावांसह उत्तम सुरुवात केली असली तरी याचे तो मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकला नाही. बेअरस्टो चहलला स्लॉग स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला होता. उभय संघातील तिसरी व शेवटची वनडे रविवारी खेळवली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : 49 षटकात सर्वबाद 246. (मोईन अली 64 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 47, डेव्हिड विली 49 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 41, जॉनी बेअरस्टो 38 चेंडूत 6 चौकारांसह 38, लियाम लिव्हिंगस्टोन 33 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 33. अवांतर 13. यजुवेंद्र चहल 10 षटकात 4-47, बुमराह व पंडय़ा प्रत्येकी 2 बळी, शमी 10 षटकात 1-48, प्रसिद्ध कृष्णा 1-53).
भारत : 38.5 षटकात सर्वबाद 146 (सूर्यकुमार यादव 29 चेंडूत 27, हार्दिक पंडय़ा 44 चेंडूत 2 चौकारांसह 29, रविंद जडेजा 44 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 29, मोहम्मद शमी 28 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 23. रीस टॉपली 9.5 षटकात 6-24, डेव्हिड विली 1-27, ब्रेडॉन कार्स 1-32, मोईन अली 1-30, लियाम लिव्हिंगस्टोन 1-4)









